मृदुला, वेदश्री, अनुजा, प्रियाली, टग्या, तात्या, सर्किट, केवळ विशेष आणि अज्जुका आपणा सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या विषयावरची चर्चा फारच चांगली सुरु आहे. परदेशातल्या प्रथाही या कारणामुळे मला कळल्या. सध्याच्या या वेगवान जगात खरतर रुखवत करत बसणे वगैरे गोष्टींना फारसा थारा उरलेला नाही. तरीही ही प्रथा अजूनही समाजात कुठे कुठे दिसते हे नक्की.
आमच्या लग्नाच्या वेळी ( आज पासून 10 वर्ष आधी) लग्नाची बोलणी सुरु असतानाच हा विषय चर्चेला आला होता तेव्हा घरातल्या सर्व मोठ्या मंडळींनी चर्चा करुन रुखवतावर काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं हे ठरवलं. सासू बाईंना मुलगी नसल्यामुळे त्यांची हौसही त्यांना पुरवून घ्यायची होती. त्यामुळे लेकाच्या संसारासाठी त्यांनी केलेल्या कला कुसरीच्या वस्तू देखील रुखवतावर मांडायच्या असं ठरलं. आमच्या लग्नाचं रुखवत दोन्ही कडच्या लोकांनी केलेलं होतं म्हणजे पतिराजांच्या आई, मावशी, मामी आणि आत्यांपासून ते माझ्या मावश्या माम्या आणि आत्यांनी केलेल्या वस्तू आणि पदार्थ यांनी सजलेली दोन मोठ्ठी टेबलं मांडली होती. खाऊचे देखील भरपूर पदार्थ होते. लग्नाच्या दुसर्या दिवशी संध्याकाळी घरातले समस्त नातेवाईक आणि शहरातले स्नेही यांना रुखवत जेवायचे आमंत्रण होते. सुटसुटीत पाव भाजीच्या मेनू बरोबर लग्नातल्या फराळाचा फन्ना उडाला. ही झाली आमच्या रुखवताची कथा. बाकी काळाच्या ओघात ही प्रथा प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार केलेल्या सुधारणांसह टिकून राहो हीच इच्छा.