मला वाटते, शास्त्रीय संगीतात (मुख्यतः ख्याल या प्रकारात) सूर, ताल, लय यांनाच जवळ जवळ सारे महत्त्व असते. कधी कधी अत्यंत अर्थपूर्ण बंदिशा ऐकायला मिळतात. अत्यंत भावपूर्ण पद्धतीने त्या सादरही केल्या जातात. पण उच्चारलेल्या शब्दांचा अर्थ नेहमी समजलाच पाहिजे असे सगळेच गायक समजत नाहीत असे वाटावे, इतके  अस्पष्टपणे ते कधी कधी  ऐकू येतात.   तरीसुद्धा आवाजातील गोडवा, सुरामधील सच्चेपणा, ताना घेण्यातील कौशल्य वगैरेमुळे ते गायन ऐकायला  छान वाटते. वाद्यसंगीताला किंवा तराण्यामधील शब्दांना कोणता अर्थ असतो? तरीसुद्धा ते ऐकायला किती चांगले वाटतात? मला वाटते ख्यालगायनामधील शब्दांचा अर्थ शोधण्यापेक्षा तो कोणता राग आहे? त्या रागावर आधारलेली (त्यातील आलापांसारखी चाल असलेली) कोणती गाणी आहेत? त्या गाण्यामध्ये कशा प्रकारच्या ताना, कोणत्या खास जागा घेतल्या आहेत? वगैरे आठवायचा प्रयत्न  केला तर  शास्त्रीय संगीताची जास्त  गोडी लागेल.