पाश्चात्य देशातली वेडिंग रजिस्ट्री चमत्कारिक वाटली तरी मला आवडते ते म्हणजे लग्नाच्या वेळी वस्तू स्विकारायला उभे रहायचा नवरानवरीचा वेळ वाचतो, त्या वस्तू कार्यालयातून घरी हलवायचा देखील वेळ वाचतो यामुळे. 

पण त्यात विचार नसला तर काय होते  याचा वेडिंग रजिस्ट्रीच्याच संदर्भात आमच्याच बाबतीत झालेला किस्सा.  मी नुकतीच अमेरिकेत आले होते नवीन लग्न होऊन.  आम्हाला इथल्या एका लग्नाचे आमंत्रण आले होते.  लग्न आमच्या ओळखीतल्या एका वडिलधाऱ्या व्यक्तीच्या मुलीचे होते.  मी वेडिंग रजिस्ट्री बघायला गेले ती एका प्रचंड महाग दुकानाचीच ठेवली होती.  तिथल्या साध्या साध्या गोष्टी देखील खूप महाग होत्या आणि बाकीच्या गोष्टी परवडत नाहीत म्हणून एखादा काचेचा सट देणे हे अर्थातच बरे वाटत नव्हते.  अर्थात आम्ही कठीण असतानाही खर्च केलाच.  त्यानंतर लग्नालाही गेलो.  त्या नवऱ्या मुलीने आमच्या टेबलवर यायची फारशी तसदी घेतली नाही.   आणि नंतर काही दिवसांनी आमच्या नावापुढे अंकल आणि आंटी जोडून आभार मानणारे पत्रही आले!  एका साधारण आमच्याच वयाच्या मुलीने असे आमची माहिती नसताना पत्र पाठवलेले वाचून आमची खूप करमणूक झाली. 

अर्थात प्रश्न हा रुखवताचा आहे.  रूखवत पूर्वीच्याच पद्धतीने ठेवावे किंवा ते मांडूच नये (ते मांडणे म्हणजे जुनाटपणा) या दोन्ही गोष्टी टोकाच्या भूमिकेतून आलेल्या आहेत असे मला वाटते.  शेवटी समाज म्हणून जर काही रितीभाती पाळायच्या असतील तर हे सर्व कधीकधी तडजोड करून करावे लागते.  मुलांचे आपल्यासाठी नव्या पद्धतीने (पाश्चात्यांसाठी ती जुनीच पद्धत आहे) वाढदिवस करताना केक आणणे, तो त्यावर मेणबत्त्या लावून त्या विझवून मग कापणे ह्या गोष्टी आपल्यातले बरेच जण मुलांना आवडतात म्हणून करतातच - नाही का?.  शिवाय वस्तूही घेतात(कधीकधी सर्वांसमोर त्या उघडण्याचे सोहळेही होतात),  आलेल्या मुलांना वस्तू देतात - तसेच काहीसे हे आहे नाही का?  लग्नाचे विधी एका दिवशी होऊन संपतात, पण बरीचशी नाती आधी आणि नंतरही राहतात आणि त्यांची गरज ज्यांना असते त्यांनी थोडेफार बदल करून या गोष्टी केल्या तर काही चुकीचे नाही. 

लग्नात अहेर देऊ-घेऊ नये किंवा कसे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे मला वाटते.  पण घेतला तर कोणी काय दिले, किती दिले याची उठाठेव करू नये हे खरे.  आपण तसेही मनातल्या मनात फार निवाडे करत असतो - हिने लग्न रजिस्टर केले म्हणजे ही समाजवादी किंवा पुरोगामी, त्याने लग्न देवदेवक वगैरे सर्व ठेवून केले म्हणजे तो परंपरावादी वगैरे.  पण मला वाटते माणसे एका लग्नाच्या दिवशी त्यांनी काय केले यावरून ओळखता येत नाहीत.  मला अनुप्रिताचे म्हणणे पटते.   रूखवत अगदी कालबाह्य ठरवून काढून टाकायची काही गरज नाही.  रूखवताची कल्पना तशीच ठेवून नव्या पद्धतीने त्यात बदल करता येऊ शकतात.  एकांकडून अशीच ऐकलेली एक गोष्ट - कोण्या एका लग्नात फक्त पुस्तकेच रुखवतात मांडली होती. 

 

सुहासिनी