प्रिय चित्त / लिखाळ,
१] मला वाटतं इंग्रजी आणि मराठी वाक्यांची आणि काळांची रूपं बघितली तर-
(१) ही डज नॉट कम - तो येत नाही (साधा वर्तमानकाळ)
(२) ही इज नॉट कमिंग - तो येत नाही आहे (चालू वर्तमानकाळ)
(३) ही हॅज नॉट कम - तो आलेला नाही आहे (पूर्ण वर्तमानकाळ)
(४) ही हॅज नॉट बीन कमिंग - तो (अलीकडे) येत (आलेला) नाही आहे. (पूर्ण चालू वर्तमानकाळ)
इथे (१) सोडून बाकी ठिकाणी 'नाही आहे' हेच मला बरोबर वाटतात, फक्त 'नाही' पेक्षा. (इंग्रजी काळ फक्त 'नाही आहे' की नुसतं 'नाही' या उदाहरणाच्या स्पष्टीकरणासाठी घेतले आहेत. मराठी काळ आणि इंग्रजी काळ यातलं साधर्म्य / फरक यांची चर्चा करण्यासाठी नाही).
'नाहीये' हे 'नाही आहे' चं रूप मला तरी लेखी आवडतं.
२] तसंच अलीकडेच 'मनोगत'वर झालेल्या अनेक चर्चांप्रमाणे बोली भाषा (उदा. नाहीये) वगैरे जर लिखाणात वापरता येऊ शकतात, तर काव्यातही चालायला हरकत नाही; पण शेवटी आपल्याला काय वाचायला / ऐकायला चांगलं वाटतं या सापेक्ष गोष्टीवर ते अवलंबून आहे.
वरच्या कवितेतलं 'ल्ये' मला स्वत:ला नाही आवडलं, कारण बहुधा तशा बोलीची (बोलायची / वाचायची /ऐकायची) मला सवय नाहीये. (पण नाहीये या शब्दाची आहे). हीच व्यक्ति-सापेक्षता!
३] कित्येक कवी माझिया, तुझिया अशी कविता मात्रांमधे बसवण्यासाठी पूर्वापार चालत आलेली शब्दांची अजूनही रूपं वापरतात (जी आपण व्यवहारात मात्र वापरत नाही), त्यापेक्षा मला व्यवहारात वापरली जाणारी बोली भाषा आवडेल. उदा. इलाही जमादारांचा एक शेर (नीट आठवत नाहीये, चू. भू. द्या. घ्या.)-
'जखमा अशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा'
इथे 'झाल्यात' / 'केलेत' ही 'झाल्या आहेत' / 'केले आहेत' ची रूपं मला तरी पटतात, आवडतात.
- कुमार
- कुमार