नमस्कार,

माझ्या मते , "आपल्या संस्कृतीत आदर्शांची पुजा केल्यास ते आदर्श आपल्यात उतरतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे जो व्यक्ती आदर्श असेल त्याचं  स्मरण, मनन आणि त्यांच्या आदर्श गुणांचं चिंतन आपण केलं पाहिजे, म्हणजे आपण त्या गुनवैशिष्ट्यांना आपल्यात उतरवू शकतो."   अशी मूळ भावना आहे.

यानंतर मग वेगवेगळ्या काळानुरूप या संकल्पनेच्या बाह्य अंगात काही कमी काही जास्त बदल झालेले आढळतात.

आता देव या संकल्पनेवर येऊ. माझ्या मते देव ही निव्वळ आदर्श या संकल्पनेला समानार्थी संकल्पना आहे. भगवान शंकर हे आपल्या तप सामर्थ्याने एवढ्या मोठ्या पदावर पोहोचले होते की त्यांच्या कडे समाजातील सर्वोच्च शक्ती होती. मात्र तरीही त्या शक्तीचे रुपांतर त्यांच्या अहंकारात न होता विरक्तीत झाले , ही बाब त्यांना देवत्व प्राप्त करून देते. फक्त देव नाही तर यांना त्याही वरचा म्हणजे महादेव म्हटल्या जातं.

आता ३३ कोटी देव या संकल्पनेवर येऊ, मुळात ही संकल्पना भारतातील एकेकाळची आदर्श व्यवस्था दर्शविणारी आहे. आणि हिचा उगम ती परिस्थिती होऊन गेल्या नंतर झालेला असावा. आपल्याला समजण्यासाठी ही परिस्थिती अगदी आपल्या ,"पूर्वीचं पुणं राहिलं नाही आता" सारखी आहे. वर्तमानात ही स्थिती कधीच नसते. म्हणून या ३३कोटी या आकड्यात बदल झाला नसावा.

स्वर्ग , पृथ्वी आणि पाताळ ह्या संकल्पना खूप आधीच्या मात्र भारताच्या भौगोलिक रचनेशी संबंधित होत्या. उत्तर भारत म्हणजे स्वर्ग(ज्यात हिमालय येतो) मध्य भारत म्हणजे पृथ्वी आणि दक्षिण भारत म्हणजे पाताळ.

भगीरथाने गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणली आणि तिचा प्रवाह पृथ्वीवरून पाताळातील त्याच्या वंशजांच्या अस्थींहून गेली व त्यांचे कल्याण झाले. यातील अर्थ चटकन  लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला आताच्या काळातील भगीरथाचे नाव सांगतो. ते म्हणजे राजस्थानातील जोहडवाले बाबा. यांनी सुद्धा अशीच पाण्याची गंगा निर्माण (जलसंवर्धन) करून राजस्थानातील लोकांचे कल्याण केले.

माझ्या या स्वर्ग आणि पाताळाच्या साठी एक श्लोक सुद्धा सांगता येईल. उज्जैनच्या महांकालेश्वरासाठी तो म्हणतात. माझं संस्कृत कच्चं आहे. कुणाला तो श्लोक आठवत असेल तर तो द्यावा. मी त्याचा मथितार्थ देतो. त्याश्लोका नुसार, स्वर्गलोकात एक शिवलिंग आहे, मृत्युलोकात एक आहे( जे की हे महांकालेश्वर) आणि पाताळात एक आहे. आजच्या भारतात जर का या तिन्ही शिवलिंगांचा शोध घेतल्यास ते भारतात असेच उत्तर ते दक्षिण सापडतात.

अशी अनेक उदाहरणे देता येतील. मात्र खरं सांगायचं म्हणजे आपली पुराणे म्हणजे बखरी आहेत. यात लेखक हा कलाकार असतो आणि तो त्याची निपुणता आपल्या लिखाणाद्वारे दाखवीत असतो.

ज्या लेखकाला सध्य स्थितीतील समाज मानसिकता जास्त समजली आणि त्याच्या लिखाणात ती उतरली त्या लेखकाने लिहिलेली ग्रंथे जास्त प्रसिद्ध झाली. उदाहरण द्यायचे झाल्यास वाल्मीकी लिखित रामायण आणि तुलसीदास लिखित रामायण. वाल्मीकींनी लिहिलेलं रामायण काही काळानंतर जरा जुनं वाटायला लागलं आणि ते हवा तो संदेश हव्या त्या ताकदीने प्रसारित करीत नसल्याचं जाणवलं म्हणून तुलसीदासाने नवं( मात्र मनानेच) रामायण लिहिलं. त्याकाळची समाजमान्यता मिळावी म्हणून रामाच्या दृष्टांताचे धडधडीत असत्य वचन बोलला जे त्या काळी सहज समाजमान्य झालं. हा माणूस विचारसरणीने अगदी बुरसटलेला होता. समाजातील विषमतेला त्याने रामच्या कथेतून पायाभूत मान्यता मिळवून दिली. हे जरी खरं असलं तरी तो एक उत्तम कवी होता हे कुणी नाकारू शकत नाही. हे त्याचं सहज आणि प्रलोभिक कवित्व त्या काळातील जनतेला भावलं आणि वाल्मिकी रामायण मागे पडून सर्वत्र रामचरितमानसाचा प्रसार झाला.

जे झालं ते त्याकाळी बरोबर असेल असं त्याकाळी वाटू शकतं मात्र आज ते चूक आहे असं वाटतंय आणि हे बदलल्या जायला हवं, आज हे बदल कुण्या एका मानसाने करून ते समाजात मान्यता पावायला एखाद्या चमत्काराचा आधार घेऊ शकत नाही तर आजच्या धर्मपीठाने ते केल्यास ते समाजात झिरपेल अशी आजची सामाजिक मानसिकता आहे. असं माझं मत. असो.

देव म्हणजे  आदर्श असं म्हटल्यावरही मला इंद्राला देव किंवा देवाचा राजा म्हणताना लाज वाटते. मात्र इंद्राचं वर्तन त्याच्या मानवी मर्यादा स्पष्ट करतं आणि माझ्या समर्थनाला बळकटी देतं असं मला वाटतं. देव ही संकल्पना भारतीय आहे . मुळात वेदात सुद्धा नैसर्गिक घटकांनाच पुजल्या जात असे.  आधीच्या भारतीय संस्कृतीत सुद्धा नैसर्गिक घटकांनाच पुजल्या जात असे. मात्र आर्य लोक सृष्टीच्या मूळ संकल्पनेला म्हणजे पंचमहाभूतांना पुजीत असे जसे अग्नी , वायू आदी. आधीचे भारतीय ज्यांना द्रविड म्हटल्या जातं ते प्रकट चिन्हांना पुजीत असे. जसे झाड, नाग, बैल आदी. पुढे या दोघांचा संगम -संकर झाला आणि आपला हिंदू धर्म अस्तित्वात आला. यात मूळ संकल्पना कायम राहिली मात्र कवींना मोकळं रान भेटलं त्यांचं कवित्व भराला गेलं आणि कित्येकदा मूळ अर्थ नाहीसा झालेला दिसून येतो.

परंपरा, संस्कार आणि रुढी ह्या पिढ्यान पिढ्या संकलित झालेल्या ज्ञानातून जाणीवपूर्वक बनवल्या गेलेल्या आहेत. त्यांच्या मूळ अर्थाला धक्का न लावता त्यातील कालसापेक्ष बाबींना बदलवण्याचा अधिकार प्रत्येक पिढीला दिलेला आहे. तो जर बजावला तर आपल्या धर्माचं कालसापेक्षत्व टिकेल आणि नाही बजावला तर तो मध्ययुगीन बनून राहील, व काही काळानंतर प्राणहीन होईल.

खूप बोललो आता थांबतो.

नीलकांत