सामाजिक समरसतेची मांडणी आम्ही आणि तुम्ही प्रत्येकाने चिमूट चिमूट मेहनतीने करायची असते
पटले. ही चिमूटभर मेहनत कशी करायची त्याचे मार्गही सुचवावे.
आमच्या साताऱ्याच्या पंचवीसेक घरांच्या वसाहतीत सतत काही ना काही सामुदायिक कार्यक्रम चालू असतात. वसाहतीत विविध (आर्थिक) थरांतील, जातींतील लोक आहेत. लोकांमध्ये वैयक्तिक भांडणे वगैरे नाहीत असे नाही. पण वसाहतीचा कार्यक्रम म्हटले की सगळे एकत्र येतात. आरत्या, पूजा, प्रसाद वगैरे असेल तर तेही मिळून केले जाते. अमका या जातीचा आहे म्हणून तो हवा किंवा नको असे कोणी म्हणत नाही. या सगळ्याची सुरुवात आम्ही मुले लहान असताना झाली. मुलांचे कार्यक्रम होता होता, मुले मोठी झाल्याने आता ते मोठ्यांचे कार्यक्रम झाले आहेत!
वर मेहनतीचे मार्ग सुचवावे असे लिहिल्यावर आपल्याला काही उदाहरण सुचते आहे का असा विचार केल्यावर मुळात ही गोष्ट लक्षात आली की उदाहरण शेजारीच आहे.
खैरलांजीतील घटना निःसंशय निषेधार्ह आहे. त्याकडे दलिंतावरील अत्याचार म्हणून बघण्याऐवजी मी स्त्रियांवरील अत्याचार असे म्हणून बघत होते. एखाद्या घटनेला दलित-उच्चवर्णीय संघर्षाचा रंग दिला तर मला लागलीच त्यात काहीतरी राजकीय गणित असावे असा संशय येतो. जिवानिशी जाणाऱ्यांच्या टाळूवरचे लोणी तथाकथित नेते नक्राश्रू ढाळत मोठ्या चवीने खातात असेच वाटते.