नमस्कार,

माझ्या लिहिण्याला तुम्ही नेहमीच प्रोत्साहन देत असता त्याबद्दल धन्यवाद.

येथे संघाचा उल्लेख झाला यात खटकण्यासारखं ते काय? हे बघा मानसाला कसलाच कावीळ असता कामा नये , कावीळ तो कुठलाही असो... भगवा, लाल, निळा, हिरवा किंवा इतर कुठलाही. तो वाईटच.

तुम्ही आणि इतरही कुणी संघाच्या काही मतांशी मतभिन्नता ठेवून असाल. संघाच्या काही गोष्टी मलाही खटकतात. मात्र म्हणून आपण संघाच्या सेवा कार्याची दखल सुद्धा घेऊ नये हे काही पटत नाही. माझ्या जवळचा मित्र जो संघविचारी आहे तो गेल्या काही वर्षांपासून घरदार सोडून तेथे अरुणाचलात राहतो आहे. घरचा गर्भश्रीमंत असलेला मुलगा सगळ्या सुखसोयी सोडून तेथे रानावनात राहून आपल्या भारतीय असण्याचं मोल चुकवतो असं त्याचं म्हणणं.

या सर्वांमागची संघाची प्रेरणा निश्चितच प्रशंसनीय आहे असं मला वाटतं. संघाला अनेक आयाम आहेत. केवळ आपल्याला दिसेल तोच खरा आणि त्यावरूनच संघ वाईट असं बोलणं जरा आततायीपणाचं होईल असं वाटतं.

रामकृष्ण मिशनच्या कार्यकर्त्यांचं काम सुद्धा असंच भरीव आहे. मात्र कुठलाही कॉमरेड तेथे काम करताना दिसत नाही, ते का? आणि आपल्या ईशान्य भारताच्या समस्येवर तुमच्या दास कॅपिटल मध्ये काही उपाय आहे का?

नीलकांत