माझे मत पूर्णपणे माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारीत आहे व स्त्री-वर्गाचा रोष ओढवून घेण्याचा धोका पत्करून खाली देत आहे.
ज्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकत आहेत अशा अनेक दांपत्याशी बोलताना मला असे जाणवले की मुलांच्या शिक्षणाबद्दल अनेक 'पपां'चेचे मत आपल्या मुला/मुलीने मराठी माध्यमातून शिकावे असे असते पण आश्चर्यकारकरीत्या सर्व 'मम्मीं'ना मात्र आपल्या मुला/मुलीने इंग्रजी माध्यमातूनच शिकावे असे वाटते!!
जरा खोदून विचारल्यावर या सर्वच जणींनी दिलेले उत्तर असे की मुलांत आधुनिक 'स्मार्टनेस' (त्यांचाच शब्द) येण्यासाठी इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण अनिवार्य आहे!' मराठी माध्यमातून शिकलेल्या आया व काही बाबाही (कसेही वा कसेतरीच) इंग्लिश बोलणाऱ्या बाळा/बाळीकडे कौतुकाने,डोळे व कान विस्फारून बघत असतात पण आपल्या मुलाला अगदी सोपी,बाळबोध मराठीसुद्धा वाचता येत नाही याचे मात्र त्यांना काहीच वैषम्य वाटत नाही.
मला नुकताच आलेला अनुभव सांगतो. बहिणाबाईंच्या कवितांची आवड व बऱ्यापैकी अभ्यास असलेली एक आई व तिची सहा-सात वर्षाची मुलगी माझ्या घरी आल्या होत्या. आई भरभरून बहिणाबाईंच्या कवितांबद्दल,मराठी भाषा व संस्कृतीबद्दल बोलत होती. जवळ नुसत्याच बसलेल्या मुलीला 'मी काही वाचायला देऊ का?' असे विचारल्यावर 'अहो, तिला मराठी वाचता येत नाही! 'इंग्लिश मीडियम मध्ये जाते ना!'असे ओशाळवाणे उत्तर मिळाले.'तुम्ही घरात तिच्या वाचनासाठी मराठीतील सोप्या गोष्टी-गाणी-कवितांची पुस्तके का आणत नाही?' असे विचारल्यावर ती 'मम्मी' निरुत्तर झाली!!
अनेक आई-बाबांना लहान वयात पुलंच्या ध्वनी-चित्रफिती लक्ष देऊन ऐकणाऱ्या/पाहणाऱ्या व पुलंना कौतुकाने 'सॉलिड कॉमेडी आजोबा' म्हणणाऱ्या आपला मुला/मुलीला, बारावी कॉलेजला आल्यावरही 'व्यक्ती आणि वल्ली' वाचायला आणून द्यावे असे वाटत नाही̱. घरात पुस्तके असली तर मुले ती आज ना उद्या वाचतातच असा अनुभव आहे. आई-वडीलांनी ती फक्त उपलब्ध करून द्यावीत.
जयंता५२