एकदा पुण्याच्या लक्ष्मी रस्त्या जवळच्या अगदी मराठमोळ्या दुकानात जमिनीवर अंथरलेल्या गाद्यांवर बायकोबरोबर बसून साडी खरेदीचा आनंद लुटत होतो. पण त्या सकस अनुभवात इंग्रजीची भेसळ अगदी खड्याप्रमाणे बोचली. दुकानदार सर्व भावनादर्शक शब्द इंग्रजीतून बोलत होता. म्हणजे  "हे बघा - ह्या साडीचा ब्लु कलर अगदी ब्राईट आहे आणि मटिरीयल पण अगदी सॉफ्ट आहे" असं काहीतरी प्रत्येक वाक्यात म्हणत होता. त्यावरून मला वाटले की हा दुकानदार बहुदा स्त्री दाक्षिण्य म्हणून इंग्रजीचा वापर भावनांपासून त्रयस्थपणा आणायला करत असेल. आता हे वाक्य त्याने मराठीत म्हटलं असतं तर "ह्या साडीचा निळाशार रंग अगदी उठून दिसेल आणी हे कापड पण अगदी निर्मळ आहे" हे जरा जास्त भावनिक आणि जवळीक दाखवणारं वाटलं असतं.