इंग्लिशाळलेले मराठी कसे सगळीकडे पसरले आहे ते पुष्कळवेळा खुसखुशीत शैलीत मांडून दाखवले जाते, आणि ऐकणाऱ्याच्या/वाचणाऱ्याच्या चार घटका विरंगुळ्याच्या आणि आनंदाच्या जातात. अनेक मान्यवर आणि प्रथितयश विनोदी लेखकांनी अशा तऱ्हेचे हलकेफुलके विनोद केल्याचे आणि रसिक वाचकांनी/श्रोत्यांनी आपल्या मित्रमंडळींना आवर्जून ते सांगून आपल्या आनंदात सामील करून घेतल्याचे दिसते. पुष्कळ होतकरू लेखकही महाजनो येन गतः स पंथः म्हणून अशा हुकमी विनोदी तंत्राचा यशस्वीपणे अंगिकार करून यशाच्या वाटेवर पावले टाकताना दिसतात. कर्तबगार मराठी तरुण आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले असल्याने अशा विनोदी वाङ्मयाचा फैलावही पुस्तके, इंटरनेट, कॅसेटस ह्याद्वारे जोमाने होतो. कित्येक खाजगी संमेलनांत जेवणसमारंभांत अशी हास्यविनोदाची कारंजी उडताना तुम्ही पाहिलेली असतील.
असे मराठी हा करमणुकीचा विषय नसून ती एक समस्या आहे असे म्हटले तर मात्र ह्या आनंदावर पाणी पडते. समस्येवर उपाय सुचवणे हे दुर्दैवाने तितकेसे खुसखुशीत राहत नाही आणि ते ऐकायलाही कोणी उरण्याची शक्यता नसते, त्यामुळे उपाय सुचवण्याचा गंभीरपणा/कडवटपणा कोणी घेऊ पाहत नाही. शेवटी जे केल्याने आनंद होईल ते माणसे करणार हा निसर्ग आहे.
प्रस्तुत चर्चाविषय हा अशा मराठीवर किंवा मराठी असे होण्यापासून वाचवण्यावर उपाय काय, असा आहेसे वाटते. कोणाला काही उपाय सुचत असेल तर तो वाचायला आवडेल.