ह्या लेखात नमूद झालेल्या इंग्रजी शब्दांपैकी अनेक शब्द आता मराठीत रूढ झाले आहेत. उदा. ट्यूब, बल्ब, वायर आता मराठीत रूढ झाले आहेत.
बऱ्याच शब्दांना मराठी वाटावेसे मराठी प्रतिशब्द मिळू शकतील. पण अनेक शब्दांच्याबाबतीत मात्र हे शक्य होईलच असे नाही. अशावेळी ओढूनताणून, अट्टाहासाने बनवलेले आणि हास्यास्पद देऊ नयेत आणि जिथे सोपे आणि अगदी मराठी वाटावेत असे प्रतिशब्द मिळत नाहीत तिथे मराठीने इंग्रजी किंवा परकीय शब्द वापरायला हरकत नसावी.
दुसरे म्हणजे इंग्रजी शब्द भाषेत आले म्हणजे ती मराठी भाषा राहात नाही काय? किंवा मराठी शब्द इंग्रजीत आले तर ती मराठी राहात नाही काय? दोन्हींचे उत्तर 'नाही' असेच आहे, असेच भाषाशास्त्रज्ञ /भाषावैज्ञानिक म्हणतात. आम्ही मराठी कितीही जिवापाड जपली तर सामान्य मराठी माणूस त्याला जे सोयीचे वाटतात ते शब्द, शब्दप्रयोग स्वीकारणारच. "दूरचित्रवाणीवर कसोटी सामन्याचे धावते प्रक्षेपण होणार आहे" ह्या वाक्यापेक्षा "टीवीवर टेस्ट मॅच लाइव दाखवणार आहेत" ह्या वाक्याशी तो जास्त 'कम्फ़र्टेबल' असतो, ही वस्तुस्थिती आहे.
केवळ शब्द टिकवले, जतन केले म्हणजे भाषा टिकवली जाते, जतन होते का? मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी भाषेची धाटणी, तिच्या लकबी टिकायला, टिकवायला हव्यात, असेही तज्ज्ञ म्हणता. पण जिवंत भाषा सारखी बदलत असते. उदा. आजकाल "मला मदत कर" ऐवजी अनेक जण "माझी मदत कर" असे म्हणतात. हे आणि असले बदल मराठी भाषा स्वीकारताना दिसते आहे.
मग मराठी भाषा टिकवायची म्हणजे नक्की काय टिकवायचे, जतन करायचे ह्या प्रश्नांचे उत्तर शोधायला हवे. जिवंत भाषा बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ. अशावेळी मराठी भाषा का टिकवायला हवी.