समजा मराठी वाचकांनी जे एकदम खरे उच्च काव्य आहे त्यालाच डोक्यावर घेतले
असते, तर कवींनी खउकाव्य लिहिले असते! हे लोकानुनयी नाही काय?
नक्कीच लोकानुनयी. तिथे लोकानुरंजनी हा शब्द हवा होता. लोकांचे रंजन करणे म्हणजे महापातक नाही. शेक्सपिअरने दुसरे काय केले?
त्याची नाटके बहुजनांत आणि अभिजनांत सारखीच लोकप्रिय होती, आहेत. जे लोकांना आवडते, जे खपते तेच केवळ पुरवायला हवे, अशी साहित्यिक बाकरवडीवादी भूमिका घेऊन लिखाण करण्यास माझा विरोध आहे.
शिवाय समजा एखाद्या कवीने खउकाव्य लिहिले आणि ते लोकांना पसंत पडेलसे आहे असे प्रकाशकाला वाटले नाही तर ते प्रसिद्ध होईल का?
नाही होत ना. अनेक मोठ्या साहित्यिकांच्या मोठ्या दर्जेदार कलाकृतींना प्रकाशकांपेक्षा त्यांच्या कचऱ्याच्या टोपलीने आपुलकीने, सहानुभूतीने वागवले आहे. अनेक दाखले देता येतील. आणि प्रकाशकाच्या दृष्टीने जे प्रसिद्ध होण्यासारखेच लेखनच खउकाव्य, खऊसाहित्य असते काय?
कोणाला काय आवडावे हे कोण ठरवणार? जर्मन गटे महाशय कालिदासाचे शाकुंतल
डोक्यावर घेऊन नाचले होते हे वाचून मी ते नाचताना नक्की कसे दिसत असतील
अशी कल्पना करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला आहे. किती भारतीयांना ते तितके भिडते? पण तरी ते प्रसिद्ध आहेच की! तसेच मराठी
टीकाकार अमके तमके 'भयंकर सुंदर' असे म्हणत असतात त्या त्या गोष्टी
थोड्याफार प्रसिद्ध होतातच. पण टीकाकाराचे आणि वाचकांचे खउ काय आहे
याबद्दल मत जुळेलच असे नाही. ते जुळावे असा हट्ट का? कोणाला काय वाचून
रडावेसे वाटावे हे कोणी तिसऱ्याने का ठरवावे? एखाद्याने अमक्याप्रकारचे
लिहायचे ठरवले (असे ठरवून लिहिता येते का?) तर तो शहीद झाला असे कोणी का
म्हणावे?
कोणाला काय आवडावे हे कुणाला ठरवता येत नाही. एखाद्याला फुटाणेच का आवडवेत, बदाम का नाही ह्या गोष्टीला उत्तर नाही. फुटाणे आवडणे गैर नाही. त्यांची लिज्जत न्यारी. पण फुटाणे आवडतात हे तर कळते ना. आणि तसे कुणी सांगणे गैर नाही.
गटेला आणि अनेकांना शाकुंतल हे का भिडत असावे, ह्याचे उत्तर माझ्यापाशी नाही. कारण मी ते वाचलेले नाही. संस्कृतपंडित ह्याचे उत्तर देऊ शकतात. पण मुद्दा वेगळा आहे. अनेक वाचक कवितेच्या चेहऱ्यावर, बाह्य रूपावर भाळतात, असे मला वाटते. ते आत डोकावून आतला फोलपणा किंवा आशयाची, अभिव्यक्तीची सघनता जोखत नाहीत. कविता वाचताना गालावरून मोरपीस फिरवल्यासारखे वाटले. पण नंतर लक्षात आले हशील काहीच नाही, असे बरेचदा घडते. असो.
तसेच मराठी टीकाकार अमके तमके 'भयंकर सुंदर' असे म्हणत असतात त्या त्या
गोष्टी थोड्याफार प्रसिद्ध होतातच. पण टीकाकाराचे आणि वाचकांचे खउ काय आहे
याबद्दल मत जुळेलच असे नाही. ते जुळावे असा हट्ट का? कोणाला काय वाचून
रडावेसे वाटावे हे कोणी तिसऱ्याने का ठरवावे? एखाद्याने अमक्याप्रकारचे
लिहायचे ठरवले (असे ठरवून लिहिता येते का?) तर तो शहीद झाला असे कोणी का
म्हणावे?
शेवटी समकालीन साहित्याचा दर्जेदारपणा दुर्दैवाने मूठभर समकालीन अभिजन (प्राध्यापक, समीक्षक, प्रकाशक इत्यादी) ठरवत असतात. माझ्या मते येणारा काळच एखाद्या कलाकृतीचा खरा दर्जा ठरवत असतो.
असो. हे माझे मत. मत मांडणे म्हणजे हट्ट करणे नाही. शहीद झालेले अनेक कवी बघण्यात आहेत. ती उदाहरणे ह्या व्यासपीठावर देता येणार नाहीत.