मरीआई हे पार्वतीचे / आदिशक्तीचे मूळ रूप आहे, की मरीअम्मा अर्थात मेरीमातेचे भारताळलेले रूप आहे? तज्ज्ञांनी खुलासा करावा.
मरीआईविषयक संदर्भ मला रा. चिं. ढेरे यांच्या वरील पुस्तकात मिळाला. मुळातच तेहतीस कोटी देव या संकल्पनेचा शोध घ्यायला हवा ही ओढ मला हे पुस्तक वाचताना जाणवत राहिली व त्यातूनच मनोगतवर लिखाण केले.
मेरी मातेचा काही धागा (क्ल्यू) मिळाल्यास जरूर तीही चर्चा करू. मात्र आजतरी मला हे शाब्दिक साधर्म्य असावे असे वाटते. कारण,
१) मरीआई या देवतेचे उल्लेख जुन्या (ख्रिश्चन धार्मिक लोक येथे येण्या आधीच्याही) वाड:मयात सापडू शकतील.
२) माझ्या माहितीनुसार मेरी हे नाव ख्रिश्चन स्त्री-संत असणाऱ्या व्यक्तीचे असावे. देवतेचे नाही. मरीआई ही (बहुतांशी दाक्षिणात्य) भारतीय लोकांनी देवता मानली आहे.
३) मरीआईची विशिष्ट अशी पूजापद्धती आहे. मेरीमाता देवता असल्यास तिची पूजापद्धती व मरीआईची पूजापद्धती यांच्यातील संबंधही शोधावे लागतील व त्यांच्यात काही ना काही एकसूत्र मिळायला हवे. दोन्ही देवतांच्या उपासकांमधील संबंधांचा इतिहासदृष्ट्या शोध घेता येईल.
४) मरीआई व सटवाई या दोन्ही देवता एकच मानल्या जातात व सटवाई ही बालकाचे भविष्य पाचव्या दिवशी त्याच्या कपाळी लिहिते असे मानले जाते. याही गोष्टीचा विचार मेरीमातेचे साम्य शोधताना करायला हवा.
५)मरीआईचे व्यावहारीक रूप केवळ गोल आकाराच्या शिळेसारखे (तांदळा असा शब्द अशा मूर्तींसाठी वापरला जातो.)होते. कालांतराने त्याचे टाक, मुखस्वरूपी प्रतिमा, मूर्ती इ. तयार झाली. मेरीमातेचा आजच्या स्वरूपापर्यंत कसा विकास झाला हे शोधल्यास त्या दोन्हींतील एकत्व वा शाब्दिक साम्य यांचा शोध लागेल असे वाटते.
अर्थात, मी तज्ज्ञ नाही. एक सामान्य अभ्यासक आहे. जे वाटले ते मोकळेपणाने लिहिले, इतकेच. तज्ज्ञ व्यक्तीच अधिक प्रकाश टाकू शकतील.
अवधूत.