काल अचानक, काही कारण नसताना मला हे गाणे आठवले आणि मी दिवसभर गुणगुणत राहिले. वर सुखदाने ह्या गाण्याचा उल्लेख केला आहे, पण पूर्ण गाणे दिलेले नाही, म्हणून मी देत आहे -
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासू
सासूने काय आणलंय गं?
सासूने आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई, लावा गं बाई
झिपऱ्या कुत्र्याला सोडा गं बाई, सोडा गं बाई ॥१॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नणंद
नणदेने काय आणलंय गं?
नणदेने आणल्या तोरड्या
तोरड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई, लावा गं बाई
झिपऱ्या कुत्र्याला सोडा गं बाई, सोडा गं बाई ॥२॥
असेच सासरकडचे विविध नातेवाईक (सासरा, दीर, जाऊ वगैरे) आणि प्रत्येकाने आणलेले वेगवेगळे दागिने घेऊन अशीच कडवी म्हणायची. सगळ्यात शेवटचे कडवे असे -
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नवरा
नवऱ्याने काय आणलंय गं?
नवऱ्याने आणलं मंगळसूत्र
मंगळसूत्र मी घेते, सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा गं बाई, उघडा गं बाई
झिपऱ्या कुत्र्याला बांधा गं बाई, बांधा गं बाई ॥