माझ्या अनुभवाला थोड्या वेगळ्या पार्श्वभूमी आहे; पण विषय हाच आहे.
१४ ऑगस्टला रात्री मी उशिरापर्यंत (जवळ-जवळ १२ वाजेपर्यंत) काम करत होतो. कारण यावर्षी १५-१६ ला २ दिवस सुट्टी होती आणि तत्पूर्वी काही कामं पूर्ण होणं भाग होतं.
रात्री १२ च्या सुमाराला मी माझ्या गाडीतून ऐरोली जकात-नाक्यापाशी आलो. तिथे पोलिस असणार आणि माझी / गाडीची तपासणी होणार हे अपेक्षित होतंच.. त्याप्रमाणे २ पोलिस आले, त्यांनी कागदपत्र मागितली. एकानं मागे काय आहे म्हणून विचारलं; मी डिकी उघडायला लागलो तेवढ्यात 'ठीक आहे, जा' असं त्यानं मला सांगितलं...
माझा प्रश्न असा आहे की, या असल्या तपासातून काय निष्पन्न झालं. समजा माझ्या किंवा अशाच दुसऱ्या गाडीत स्फोटकं असती, तर ती मिळाली असती का?
सूचना - तेवढ्याच वेळात त्यांना
(१) माझं आणि गाडीचं (गाडी क्र. सकट) छायाचित्र घेता आलं असतं. योग्य उपकरणं त्यांना प्राप्त करून दिल्यास.
(२) माझं नाव, भ्रमणध्वनी / दूरध्वनी क्र (नसल्यास पत्ता), आणि लायसन्स क्र. लिहून घेता आला असता.
या गोष्टींमुळे होणारा धोका टळला असता असं नाही; (तो वर केलेल्या क्रियेमुळेही टळला नाही; फार तर काही टक्के कमी झाला) पण पोलिसांकडे चांगली माहिती उपलब्ध झाली असती, जी वेळप्रसंगी कामी आली असती.
११ जुलै च्यानंतर पोलिसांनी जो त्या सर्व घटनेचा शोध लावला आहे, बॉम्ब कसे गोवंडीत कसे कुकरमधे ठेवले, तिथून लोकलमधे नेले, इ. इ. सगळं दाद देण्याजोगंच आहे; पण वरच्या सूचनांचा विचार केल्यास कदाचित हे सगळं सुकर झालं असतं - किंवा अशा योजनाबद्ध तपासाची दहशत बसून स्थानिक लोकांची अतिरेक्यांना अशा कामी मदत मिळणं अवघड झालं असतं, असं मला वाटतं.
- कुमार