सातीताई, तुम्हाला कसला प्रतिसाद अपेक्षित आहे?

मटातील बातमी इथे वाचता आली. यातील काही माहिती दुसऱ्या चर्चेतल्या लोकसत्तेतल्या दुव्यात होती, काही नवीन. सारे प्रकरणच धक्कादायक आहे, निषेधार्ह आहे असे दुसऱ्या चर्चेत मनोगतींनी एकमुखाने म्हटले आहे. या चर्चेत न्याय मिळेल का, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याचे उत्तर कोणाला येईल? मी आज सकाळी हा धागा वाचला तेव्हा त्यावर नवे काय म्हणावे काही सुचले नाही. तेव्हा प्रतिसाद दिला नाही.

दुसरे म्हणजे, हे अगदी खरे की काही चर्चांना काही इतर चर्चांपेक्षा जास्त सहभाग मिळतो. तुमचा त्रागा मला समजतो तरी मला दिसेलसा कार्यकारण भाव सांगावासा वाटतो. खैरलांजी महाराष्ट्राच्या नकाशात नक्की कुठे आहे किती लोकांना माहित असेल? मला नाही. बातमी वाचून आश्चर्य वाटते, संताप येतो, वाईट वाटते, भोतमांगे कुटुंबीयांचे काय झाले असेल या विचाराने अस्वस्थ व्हायला होते. पण किती वेळ? दैनंदिन कार्यक्रमात हा विषय नक्कीच मागे पडतो. शेवटी मी नि माझ्या जवळच्या लोकांवर याने परिणाम झालेला नसतो ना! पण आरक्षणाचा विषय येतो तेव्हा त्यात मी स्वतः हात पोळून घेतलेले असतात. मला हव्या त्या विषयातले शिक्षण घेता आलेले नसते. माझे सध्याचे पूर्ण आयुष्य त्या एका सरकारी धोरणामुळे प्रभावित झालेले असते.

मनोगतावर लिहिणारे बहुतांशी लोक उच्चशिक्षित आहेत. सगळ्यांना ते शिक्षण घेताना आरक्षणाचा 'अडथळा' ओलांडावा लागला असणार आहे. त्यामुळे तो विषय जास्त जिव्हाळ्याचा असणे साहजिक आहे असे मला वाटते.