नमस्कार,

परभारतीय यांनी निदर्शनास आणून दिलेल्या चुकीबद्दल धन्यवाद.

तिथे मला र्‍हस्वोपान्त्य म्हणायचे होते.

तसेच उपसर्ग = prefix. चुकून suffix लिहिले आहे.

आणि या दोन्ही फक्त slip of fingers  नव्हत्या,  slip of mind होत्या (की sleep of mind?!)! (कुणी सगळ्याचे भाषांतर सुचवेल का?)

भाषाशुद्धीविषयी.

इंग्रजी भाषा नष्ट होण्याची भीती ही अतिशयोक्ती झाली. उलट नवीन नवीन भाषांतून शब्द पचवून ती अधिक बलवान होत आहे. आणि तिच्या वर्णलेखनाला (spellings) कोणताही मूलभूत धक्का पोचलेला नाही. मुख्य म्हणजे ती जेथील मूळ भाषा, त्या इंग्लंडमध्ये तिच्या शुद्धतेविषयी कुणी तडजोडी करत नाही.

संस्कृत भाषेच्या मरणासन्नतेचे कारण हे तिची शुद्धता किंवा व्याकरणावरचा भर हे नव्हते. त्याला अन्य सामाजिक, आर्थिक व राजकीय कारणे होती.

मुख्य म्हणजे भाषा बोलणार्‍यांना त्या भाषेविषयी किती आस्था आणि आपुलकी आहे हे त्यांच्या त्या भाषेतील लेखनावरून दिसते.

आपण इंग्लिश, जर्मन अशा परक्या भाषांतील वर्णलेखनाचे नियम मुकाटपणे पाळतो, त्यासाठी घोकंपट्टीही आपल्याला मान्य असते. परंतु स्वतःच्या भाषेबाबत गुळचेपेपणा आणि तडज़ोड आपल्याला मंजूर असते.

आज़ शुद्धलेखनाविषयी केलेली तडज़ोड उद्या व्याकरणाविषयी आणि परवा लिपीविषयी होणार हे निश्चित. (रोमनमधून मराठी?!) म्हणूनच केवळ आंग्लमाध्यमातून शिक्षण घेतलेल्या अनेक मुलांना आज़ मराठी वाक्यरचना नीट करता येत नाही; दुसर्‍यांनी केलेली समज़त नाही. (उदा. एक अतिसामान्य चूक: "ज़र असे असल्यास". इथे "ज़र असे असेल तर" हवे किंवा "असे असल्यास" असे हवे.) व्याकरणाशी किती तडज़ोड करावी यालाही काही मर्यादा हव्यात. परभाषिकांबाबत सहनशीलता ठीक आहे, किंबहुना ते मराठी बोलण्याचा प्रयत्न करत असतील तर ते स्वागतार्हच आहे, पण आपण आपल्याच भाषिकांना भाषेची मोडतोड करायला किती परवानगी द्यायची हे ठरवायला हवे.

भाषेचे भवितव्य हे केवळ ती कशी व किती बोलली ज़ाते, यावर नसून त्यात कसे, काय व किती लिहिले ज़ाते यावर अवलंबून आहे.

अर्थात भाषा मूलतः संवादाचे माध्यम आहे, आणि ती प्रवाही नसेल तर नष्टप्राय होणारच हे मात्र नक्की. यासाठीच इंग्रजी भाषेच्या लवचिकपणापासून आणि तरीही प्रमाणीकरणाच्या आग्रहापासून काही शिकायला हवे.

धन्यवाद,

मराठा.

ता. क. मतितार्थ नव्हे, मथितार्थ.