मराठी भाषेत सर्व शब्द भाषेच्या उगमा पासूनच अस्तित्वात आहेत.
क्षमा करा, नितीन, पण यातून तुमचे भाषाविषयक अज्ञान दिसते. मराठी ही मुळातूनच मिश्रणाची भाषा आहे. संस्कृत शब्द सोडले तरी कित्येक मराठी शब्द 'परभाषीय' म्हणजे फार्सी, अरबी वगैरे भाषांमधून आलेले आहेत. आणखी मराठी तमिळमधून उद्भवली असा खैरेंचा सिद्धांतही आहेच.
इंग्रजी नको असे म्हणताना, इंग्रजी ही मराठीपेक्षा कमी प्रतीची भाषा आहे म्हणून नको हा युक्तिवाद अगदीच फोल आहे. इंग्रजीत मराठीपेक्षा जास्त शब्द आहेत, जास्त साहित्य लिहिले जाते वगैरे तुलना करता येईल पण तशी तुलना चुकीची आहे. प्रत्येक भाषा आपल्या जागी सुंदर असते. उदा. एस्किमोंच्या भाषेत बर्फासाठी १०/ १५ शब्द असल्याचे सांगतात. तसे मराठीत नाहीत म्हणून काही तोटा होतो आहे का?
खरा मुद्दा असा आहे की भाषेतील बदल सावकाश झाले तर ते भाषेशी एकरूप होतात. पण सध्या ज्या वेगाने इंग्रजी शब्द मराठीत वापरले जात आहेत ते पाहता भाषा टिकेला काय अशी काळजी वाटते आहे. त्यासाठी सोपा उपाय म्हणजे जमतील तिथे मराठी शब्द वापरणे. व इंग्रजी शब्द वापरताना त्यांचे मराठीकरण करणे. उदा. टेबलवर ऐवजी टेबलावर, बॅगमध्ये ऐवजी बॅगेत वगैरे.
संस्कृत भाषा संगणकांत वापरता येईल असे मीही ऐकले होते. पण कोणती भाषा पाया म्हणून वापरली याने काय फरक पडतो हे कळले नाही. उदा लिनक्सप्रणाली मुख्यत्वे सी भाषेत लिहिलेली आहे. त्यात जे काही ३०/३५ शब्द आहेत ते कुठल्याही भाषेत असले तरी काय फरक पडतो? एखादी उच्च भाषा, ज्यात हजारभर शब्द आहेत (उदा मी वापरते ती ई भाषा) घेतली तर त्यात इंग्रजी ईज, लाइक वगैरे शब्द आहेत. जे ठराविक जागी यावे लागतात. त्यातून बऱ्यापैकी इंग्रजी वाक्य तयार होईल असेही नाही. संस्कृतात असे शब्द ठराविक जागी येत नाहीत. म्हणजे आज्ञावली वाचणाऱ्या कार्यक्रमाची गोची होणार. त्यापेक्षा मराठी वापरणे जास्त बरे पडेल! शिवाय मला वाटते की एकापुढे एक चिन्हे लिहिण्याची रोमन लिपी संगणकाला जास्त सोयीची आहे.
आता जो मूळ लेख लिहिला आहे, त्यात राजा-राजीचा किस्सा आवडला. बाकी मुख्यत्वे शब्दांच्या याद्याच दिल्या आहेत. असाच एक लेख फार्सी शब्द वापरूनही लिहिता येईल असे वाटते. शिवाय डी व्ही कुलकर्णी वगैरे ओढून ताणून लिहिल्यासारखे वाटते.