सत्कार झाला, त्याच गावात अत्याचार...

 [ Thursday, November 16, 2006 02:06:44 am]

/photo.cms?msid=459734 प्रतिमा जोशी , मुंबई

प्रियंका भोतमांगेला लष्करात कामगिरी बजावायची होती. बेस्ट एनसीसी कॅडेट म्हणून गौरव झालेली प्रियंका बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात ' टॉप ' आल्याने खैरलांजी गावात तिचा सत्कारही झाला होता. त्याच गावकऱ्यांनी २९ सप्टेंबरला तिच्यावर सामूहिक बलात्कार केला , मरेस्तो बदडले आणि मेल्यावरही लैंगिक अत्याचार केले. याची वाच्यता होऊ नये , झालीच तर पुरावे सापडू नयेत याचीही चोख तजवीज करून ठेवली. हे करण्यात गावातल्या पुरुषांच्या बरोबरीने महिलाही आघाडीवर होत्या , अशी माहिती माजी न्यायाधीश बी. जी. कोळसेपाटील यांच्याबरोबर गेलेल्या सत्यशोधन पथकाने ' महाराष्ट्र टाइम्स ' ला दिली.

सुजाण नागरिकांनाही गोठवणाऱ्या या प्रकरणाबाबत या समितीने दिलेल्या माहितीनुसार , भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी हत्याकांडात प्रियंकाप्रमाणेच तिची आई सुरेखा हिलाही अशाच अत्याचारांचे बळी व्हावे लागले. तिचा अंध भाऊ रोशन आणि पदवीधर भाऊ सुधीर हेही मारहाण व अमानुष लैंगिक अत्याचारातून सुटले नाही. हवेत फेकून जमावाने त्यांना खाली आदळले.

उद्ध्वस्त झालेले भय्यालाल भोतमांगे आता वटीर् गावात आपले भाचे राष्ट्रपाल ननावरेंकडे जीव मुठीत घेऊन जगत आहेत. त्यांच्यावर आणि गावकरी ज्यांच्या मागावर होते ते सिध्दार्थ गजभिये यांच्यावर राजकीय पुढाऱ्यांची करडी नजर आहे. सुरेखा भोतमांगेंमुळेच सिध्दार्थ मारहाणप्रकरणी आपल्यावर ' अॅट्रोसिटी ' लागल्याचा राग गावात अद्याप खदखदतो आहे.

याआधीही पक्कं घर बांधायला काढलं म्हणून गावकऱ्यांनी भोतमांगे कुटुंबावर जरब बसवलीच होतीे. शिवाय एक वर्षापूवीर् भोतमांगेंच्या शेजारी असलेल्या दलित तरुणाच्या हत्येचे गूढही अजून उकललेले नाही. अंगणवाडी सेविकेचे काम करणाऱ्या पंचशिला खोब्रागडे यांच्या पतीनिधनानंतर त्यांच्या सोबतीसाठी आलेल्या भाच्याशी त्यांचे अनैतिक संबंध असल्याचा बोभाटा केला गेला , भाच्याचा खून झाला. सुरेखा आणि सिध्दार्थविषयीही असाच बोभाटा केला गेला. या पार्श्वभूमीवर भय्यालाल पार गोठून गेले आहेत. (क्रमश:)