हे एक मला वाटणारं व्यक्तीगत कारण. याचाही खरेखोटेपणा व टक्केवारी पडताळून पाहिलेली नाही. अनुभवांवरून एक अनुमान बांधलेले आहे.
बऱ्याच* बायका या थोड्या जात्याच 'चूझी' (याला कोणीतरी दोन अक्षरी मराठी शब्द सुचवा रे!! मला 'आवड-निवडग्रस्त' असा शब्दच का आठवतोय कोणास ठाऊक.) असतात एवढंच नाही तर आपली आवड किंवा नावड बेधडक तोंडावर सांगण्याची त्यांना पुरुषांपेक्षा जास्त सवय असते. उदाहरणादाखल मीही बायकांना फारसे आवडणार नाही असेच उदाहरण देते,
साडी खरेदी करायला गेल्यावर समजा तुम्ही एखादी साडी बायकोसाठी उचललीत तर,
"ईईईईईई! काय तरी तुमची आवड? ही साडी नेसल्यावर मी अगदी तुमच्या आईसारखी दिसेन,"
असा टोमणा जितक्या बायका मारतील तितका टोमणा जर बायकोने नवऱ्यासाठी शर्ट उचलला तर,
"हा कसला शर्ट! हा घालून मी अगदी तुझ्या बाबांसारखा दिसेन," असं पुरूष म्हणत असतील असं मला तरी वाटत नाही**. (म्हणजे काय बिशाद हो बिचाऱ्यांची. चू. भू. दे. घे.)
यावरून असं म्हणावंस वाटतं की आपल्या उदाहरणात मुलींनी ईईईई असं म्हटलं म्हणून त्यांनाच मराठीविषयी तिरस्कार आहे किंवा मुलांना अधिक प्रेम आहे असे नसावे. कदाचित तोंड उघडून त्या प्रतिक्रिया देत असतील आणि मुले तोंड मिटून 'आलीया भोगासी' म्हणत असतील असे असावे. ;-)
* येथे सर्वसामान्यिकरण करण्याचा उद्देश नाही.
** म्हणतही असतील. माझ्या पाहण्यात नाहीत.
सर्वांनी ह. घ्या.