तर दलितांना शस्त्र बाळगता येतील - आर. आर. पाटील

अमरावती, ता. १५ - ज्या गावांत वा शहरांत दलित समाज संख्येने कमी असेल आणि तो स्वत: ला असुरक्षित समजत असेल; तर या समाजबांधवांना स्वरक्षणासाठी शस्त्रे बाळगण्याची परवानगी देण्याचा विचार करता येईल, अशी स्पष्टोक्ती राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे दिली. ........
....... विभागीय आयुक्तालयात दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खैरलांजी प्रकरणावरून काल (ता. १४) येथे झालेल्या उद्रेकानंतर श्री. पाटील यांनी आज अमरावती गाठून दलित संघटनांचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीसोबतच जखमींची जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घेतली. नुकसानग्रस्त भागाचीही त्यांनी पाहणी केली.

दलितांना त्यांच्या रक्षणासाठी शासनाने शस्त्रे पुरवावीत, या खासदार रामदास आठवले यांच्या वक्तव्याबाबत त्यांना छेडले असता ते म्हणाले, ""असे करायला हरकत नाही. याबाबत निश्‍चितच विचार करता येईल.''

या उद्रेकात चार पोलिस जखमी झाले. २० वाहनांची जाळपोळ व तोडफोड करण्यात आली. काही कार्यालयांतही तोडफोड झाली. यात ११ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे नुकसान अधिकही असू शकते, असे श्री. पाटील यांनी सांगितले. खैरलांजीप्रकरणी दलित संघटनांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत. तरीही उद्रेक होणे योग्य नाही. आंदोलनात गंभीर जखमी झालेल्या दिनेश वानखडेची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती आपल्याला नागपुरातील डॉक्‍टरांनी दिली आहे. दलित संघटनांना आता शांततेचे आवाहन करण्यात आले असून, पोलिस यंत्रणाही सतर्क आहे. अमरावतीत पोलिसांकडून झालेल्या गोळीबाराची न्यायदंडाधिकारी चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खैरलांजी मुद्द्यावरून अमरावतीत उद्रेक होणार, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली असताना पोलिस प्रशासनाने हव्या त्या प्रमाणात सतर्कता दाखविली नसल्याच्या मुद्द्यावर श्री. पाटील यांना विचारल्यावर ते म्हणाले, ""गुप्तचर खात्याकडून हवी तेवढी माहिती हाती आली नाही. याबाबतीत हे खाते जरा कमीच पडले. मात्र या खात्यात मनुष्यबळ कमी आहे.''

खैरलांजी प्रकरणात पोलिसांनी उदासीनता दाखविल्यानेच अप्रिय घटना घडल्याची कबुली श्री. पाटील यांनी दिली. याप्रकरणी तेथील पोलिस उपअधीक्षक सुसतकर यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. शिवाय, पोलिस उपनिरीक्षक भरणे, हवालदार बबन मेश्राम यांना निलंबित करण्यासोबतच त्यांच्यावर खुनाचा सहगुन्हा दाखल करण्यात आला आहे. भय्यालाल भोतमांगे यांना आठ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. खैरलांजी प्रकरणासाठी नामवंत वकील नेमण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.