डॉ. ग. ना. जोगळेकरांनी त्यांच्या "मराठी भाषेचा इतिहास" ग्रंथात ह्या विषयाचे ("भाषा शुद्धीकरण चळवळीचे") सविस्तर अवलोकन केले आहे. त्यात विविध विचारवंताच्या विचारा पैकी "वेगवेगळ्या भाषांतून आलेले शब्द वेगवेगळ्या अर्थछटा उपलब्ध करून देतात म्हणून,आलेल्या/येणाऱ्या शब्दांचे स्वागत केले पाहिजे, त्याने भाषा अधिक समृद्ध होते." हा विचार मला अधिक जवळचा वाटला.
"त्याच बरोबर एखादा शब्द जेव्हा प्रादेशिक भाषेत संस्कृतच्या माध्यमातून स्वीकारला जातो तेव्हा तोच शब्द इतर प्रादेशिक भाषांना पथदर्शक ठरू शकतो."
आपले सहमनोगती कलंत्री काकांच्या संस्कृत बद्दलच्या म्हणण्यात जे तथ्य आहे त्याचा मी आदरच करतो. पण आमची संस्कृती ठायी ठायी विश्वकल्याणाचा विचार करते, वैश्विक पातळीवर वापरलेल्या जाणाऱ्या भाषेतून येणाऱ्या शब्दांचेही अशाच स्वरूपाचे फायदे वैश्विक पातळीवर जाणवतात.
एक शब्द मला कळतो तोच रशियन आणि तोच मंगोलीयन किंवा पराग्वेच्या माणसाला समजणार असेल तर त्या शब्दाचे स्वागत मोकळ्या मनाने, त्याचे शक्य तिथे सुलभ मराठीकरण करून वापरले पाहिजे.
मराठीत अरेबिक शब्द किती आहेत याची जाणीव मला एका आफ्रीकन देशाच्या भेटीत झाली. कारण अरेबिक शब्द तिथल्या भाषेत सुद्धा वापरले जातात. प्रत्यक्ष परकीय ठिकाणी व्यवहार करताना मला त्याची मदतच झाली.तेथील कार्यालयात मी इंग्लिश मधील स्टँप शब्दाला काय म्हणत असतील हा विचार करत असताना त्यांच्या भाषेत 'मुहोरी' नावाची वस्तू घेऊन एक कर्मचारी आला आणि 'सही' च्या ऐवजी सहीही देऊन गेला.
मराठी ४ आणि ८ हे आकडे लिहिता येतात पण रोमन आकडे वापरले तर भारतीय गणिती आणि जपानी गणिती दुभाष्या शिवाय काम चालवून नेऊ शकतात.
मी विकिपीडियाच्या संदर्भात 'पिअर रिव्ह्यू' या इंग्रजी संज्ञे करिता शब्द शोधत होतो अगदी तसाच चपखल शब्द मी संस्कृत आभासी शब्दकोश विविध मराठी कोश पाहूनही मिळवू शकलो नाही. कदाचित तसे शक्यही नाही कारण इंग्लिश मध्ये "पिअर" शब्दाचे चक्क दोन वेगवेगळे अर्थ आहेत. तरीही मी शक्यते मराठी शब्द दामटलेच नाही असे नाही,पण काही वेळा तेवढ्याने समाधान होत नाही हे खरे.
आंतरजाल जसा हिंदी बोलताना ठीक वाटतो अर्थही समजतो पण मराठीत का कोण जाणे मला इंटरनेट शब्द हवासा वाटत नाही,पण " आंतरजाल" शब्दही माझा आवडता होऊ शकला नाही. अर्थात हे माझे वैयक्तिक वाटणे आहे परंतु त्यामुळे 'नेट' शब्दा करिता संस्कृतात पण 'जाल' शिवाय काही दुसरे पर्यायी शब्द मला आढळले नाही; तरी सुद्धा मी इंग्रजी जास्त समृद्ध म्हणणार नाही कारण रोमनोत्पन्न भाषा सुद्धा 'जाल' करिता 'नेट' शब्दाचीच विविध रुपे विविध संज्ञांत वापरतात नेट करिता स्वतःचे अनेक पर्यायी शब्द त्यांच्याकडे पण आहेत असे दिसत नाही. सांगण्याचा उद्देश अशी तुलना योग्य वाटत नाही.
मी "इंग्लिशाळलेले..... चर्चा क्र.२" मध्येही काही तज्ज्ञांची मते नमूद केली आहेत.
या सर्वाचा अर्थ आम्हाला मराठी वापरणे टाळावयाचे आहे असे मुळीच नाही.संस्कृतातील शब्दांचे स्वागत आहे पण सहज सोपे पणाने रुळणारे शब्द आंतरराष्ट्रीय पातळीवर उपयुक्त होत असतील तर त्यांचे स्वागत करण्यास हरकत नाही.
-विकिकर
(माझ्या कडे काही संदर्भ पुस्तके आहेत पण हाताशी नसल्यामुळे नेमके संदर्भ देऊ शकलो नाही.-क्षमस्व)