आम्ही दलितांची बाजू घेणारे फुटपाथावर मेलेल्यांचे दलित असणे कसे विसरलो असा अभयरावांचा औपरोधिक रोख आहे असे वाटते.

अपघातात जखमी होणाऱ्या मणसाची जात हा निव्वळ योगायोग असू शकतो, किमान या प्रकरणात तो असाच होता. त्यामुळे चर्चाप्रवर्तकांचा या गोष्टीचा संबंध खैरलांजी प्रकरणावरिल आमच्या विधानाशी जोडणं हास्यास्पद आहे. असो.

अपघाताचा विचार केल्यास भारतातील सध्याच्या कायद्यांनुसार या मुलांना सदोष मनुष्यवधाकरिता दोषी ठरवणे कठिण आहे.

रस्त्यावर राहणारे नाईलाज म्हणून रस्त्यावर राहतात हे म्हणणेही पुरेसे बरोबर आहेच असे नाही. माझा मुंबईच्या रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांशी दररोज कामानिमित्त संपर्क होतो. यांतील काही लोक खरेच नव्याने मुंबईत आल्याने , गरीबीमुळे रस्त्यावर राहतात पण बरेचसे झोपड्याचे भाडेही भरायला लागू नये म्हणून राहतात. यातले कित्येक व्यसनी (मुख्यतः ड्रग ऍडिक्ट असतात.)

यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न केला तरी ते  त्यास दाद देत नाहीत असे आढळले आहे.

सध्या रस्त्यावरच्या किमान लहान मुलांसाठी तरी कित्येक संस्था रात्रीचे निवारे उपलब्ध करून देत आहेत. आम्ही यांना शेल्टरमधली मुले म्हणतो. पण ही मुलेही थोडी मोठी झाली आणि मुक्त जगायची इच्छा झाली की शेल्टर वैगेरे विसरून परत पदपथावर परततात.

दुसरा मुद्दा धनिकांच्या बाळांविषयी. जोपर्यंत हातात अधिकार असूनसुद्धा पोलिस सरकार अशा रात्रीअपरात्री चालणाऱ्या निळ्या पार्ट्या (ड्रगसहित असणाऱ्या) बंद करत नाहीत तोपर्यंत केवळ पालकांच्या लक्ष देण्याने ही मुले सुधारतीलच असे नाही. आणि मुंबईतील बार बंद होतील एकवेळ पण येऊरच्या जंगलात खुल्या आकाशाखाली भरणारे बार, पाम बीच रोडवर चालणारं भन्नाट रेसिंग, गोराई, मनोर, वसई येथे चालणारे रिसॉर्टस् . या सगळ्यांना सामान्य माणूस कसं बंद करणार?

रात्री बारा एकनंतर हॉस्पिटलमध्ये बाईकच्या रेसमध्ये पडून जखमी झालेले, ड्रगच्या अतिरिक्त सेवनाने बेशुद्ध पडलेले तरुण पाहिले की सुरुवातीस तर मला त्यांच्या पालकांना दोन सणसणीत लावून द्याव्यात असे वाटायचे. आत्ता तसे वाटत नाही. कारण या गोष्टीला पूर्ण समाज आणि शासनकर्तेही तितकेच जबाबदार आहेत. (ही मुले काउन्सेलरकडे जायला तयार नसतात किंवा गेलीच तर फ़ॉलोअपकरिता येत नाहीत असा अनुभव आहे. बऱ्याचवेळा मामुली सुरुवातीचे औषधोपचार आणि पोलिसांचे सोपस्कार पार पाडले की लगेच खाजगी हॉस्पिटलात घेऊन जाण्याचा पालकांचाही कल असतो.)

                                       साती.