अत्यानंद, आपण लिहिलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने काही अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. साध्या भाषेत लिहिण्याचा उद्देशाने लिहीत असल्याने ही माहिती शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण असेलच असे नाही.
रक्त आणि रक्तघटकदान!
मानवी रक्त हे लालपेशी(red blood cells),पांढऱ्या पेशी (white blood cells), तंतूकणिका(platelets) आणि हे सगळे ज्यात मुक्तपणे वाहते तो द्राव म्हणजे plasma यांचे मिश्रण आहे. प्लास्मामध्ये प्रथिने, निरनिराळी पोषकद्रव्ये आणि रक्त गुठळी करवून आणणारे जवळपास तेरा प्रकारचे पदार्थ असतात(clotting factors).यांपैकी जवळजवळ प्रत्येक घटक कोणत्या ना कोणत्या आजारात उपयुक्त ठरतो. त्यामुळे लाल रक्ताबरोबरच हे वेगळे केलेले रक्तघटकही अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत करतात.
भारतात आणि विशेषतः मुंबईत नेहमी लागणारा घटक म्हणजे प्लेटलेट्स. पालिकेची सरकारी आकडेवारी काहीही असो आज आम्ही मुंबईत काम करणारे डॉक्टर्स दररोज कित्येक डेंग्यू, मलेरिया, लेप्टो आणि हंताव्हायरसचे रूग्ण प्लेटलेटांअभावी अक्षरशः तडफडून मरताना बघतो. प्लेटलेटांअभावी माणसाची रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबते आणि मग नाक, हिरड्या, आतडी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फुफ्फुसात रक्तस्त्राव होऊन माणसे बघता बघता मरून जातात.
याचे मुख्य कारण आहे प्लेटलेटचे अल्पायुष्य आणि रक्तघटकदानाविषयी समाजाला असलेला माहितीचा अभाव. तिसरे आणि महत्त्वाचे कारण या सर्व प्रक्रियेचा खर्च! आज पालिकेलाही संहत प्लेटलेट (platelet concentrate) करणेच परवडते ज्यामुळे एकावेळी रुग्णाच्या शरीरात ५००० प्लेटलेटची भर एकावेळी पडते. यामुळे हा साठा लवकर संपून जातो. अतिसंहत प्लेटलेट तयार करण्याची सुविधा अजून पालिका रुग्णालयात नाही. ज्या खाजगी रुग्णालयात आहे तिथे तुम्हाला हा घटक हवा असेल तर रक्तदात्याबरोबरच हा घटक वेगळा करण्यासाठी अधिक ५००० ते १०००० रु. भरावे लागतात.
हे रक्तघटक गोळा करण्याच्या दोन पद्धती आहेत, एक म्हणजे एकावेळीच दात्याच्या शिरेतून पूर्ण रक्त काढले जाते आणि ते रक्तपेढीच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार लालपेशी, पांढऱ्या पेशी, प्लास्मा, प्लेटलेट, गुठळीकर्ते घटक अशा वेगवेगळ्या गटांत विभागले जाते किंवा तसेच पूर्ण रक्त म्हणूनही साठवले जाते.
दुसरी पद्धत अफेरेसिसची. इथे दात्याच्या शरीरातून रक्त घेऊन विशेष उपकरणांद्वारे ताबडतोब वेगळे केले जाते आणि उरलेले रक्तघटक दात्याच्या शरीरात परत सोडले जातात. यासाठी एक खास यंत्र तर असतेच पण रक्त गोळा करण्याच्या सुया आणि नळ्यापण वेगळ्या असतात(यांचीच किंमत खरं तर ३००० ते ४०००)
या पेशी वेगळ्या करण्याच्या यंत्रात (निवडयंत्र?) बंदिस्त अशा प्लॅस्टिक नळ्या आणि पिशव्यांमधून हे रक्त वाहते आणि एकदा वापरलेल्या नळ्या आणि पिशव्या परत वापरता येत नाहीत. यांमुळेच रक्तदात्याला संसर्ग होण्याची कोणतीही भिती नसते. साधारण एक ते दीड तास ही प्रक्रिया चालते चालू असताना दात्याला कुठलाही त्रास किंवा वेदना होत नाहीत, सुरुवातीला सुई शरीरात घुसवताना काही त्रास होईल तोच! नंतर तुम्ही आरामात तासभर पुस्तक वाचत नाहीतर गाणी ऐकत पडा.
अधिक माहितीसाठी ही एक चांगली जागा आहे.
अजूनही काही शंका असतील तर निरसनासाठी स्वागत!
साती