या चर्चेतील मूळ कल्पना चांगलीच आहे. यात जेव्हढे करावे तेव्हढे थोडे. मला प्लेट्स संदर्भात माहीती नाही, पण रक्तगटाच्या बाबतीत यादी (डिरेक्टरी) पार्ले आणि नंतर मला वाटतयं ठाणे-डोंबिवलीतील उत्साही लोकांकडून तयार झाली होती. हे (ठाणे-डोंबिवली) मी एकले आहे पण माझे स्वतःचे नाव मी ठाण्यात असताना नव्हते (जरी मी दर वर्षी रक्तदान करायचो तरी). विसोबांना कदाचीत ठाण्याबद्दल सध्यस्थिती माहीत असेल.

एक अनुभव:

यातील पार्ल्याची यादी ८० च्या दशकापासून अस्तित्वात असून लोक मदत करायला पुढे येयचे. माझ्या एका जवळच्या नात्यातील व्यक्तीवर ह्रदयाची शस्त्रक्रीया होती ती जरा नेहेमीपेक्षा जास्तच क्लिष्ट होती. त्यात त्या व्यक्तीचा रक्तगट हा "निगेटीव्ह" असल्यामुळे सहजासहजी मिळणारा नव्हता. इस्पितळ पार्ल्याच्या जवळ असल्याने, पार्ल्यातील माझ्या काही वर्गमित्र-मैत्रीणींची मदत झाली आणि या यादीतून काही लोक ऐनवेळेस मदतीस आले - कुठलीही अपेक्षा न ठेवता.

थोडक्यात याचा (यादीचा) उपयोग बराच आहे. पण "ऑनलाईन" यादी ठेवताना त्याचा काही गैरवापर होणार नाहीना याची काळजी घ्यावी लागेल.

एक उत्सुकतेपोटी प्रश्न:

सध्या भारतात असे त्रयस्थ व्यक्तीकडून रक्तदान करून घेताना काय काय प्रश्न विचारले जातात? काय काय चाचण्या रक्तावर केल्या जातात?

अमेरिकन अनुभव:

इथे मला आधी समजले होते की भारतीयांचे रक्त घेतले जात नाही. पण नंतर समजले की मलेरियामुळे जर कोणीही भारतात जाऊन आला असला तर पुढील एक वर्ष रक्तदान करता येत नाही. मी इथे एकदा रक्तदान केल्यानंतर ३-४ महीन्यात परत रेडक्रॉस कडून फोन येयला लागला कारण तेह्वढा वेळ चालू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.

रेड्क्रॉस आणि नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ़ हेल्थ च्या बऱ्याच सुचना आहेत. मॅड काऊ डिसिज मुळे गंमत म्हणजे १९९६ पासूनच्या ब्रिटीशांवर अजूनही निर्बंध आहेत!

एड्स च्या भितीमुळे ज्या लोकांना बाहेर जाऊन चाचणि करायची लाज वाटते अथवा पैसे नसतात त्यांना रक्तदान करताना ते रक्त इतरांसाठी वापरले जाऊ नये म्हणून गोपनियता राखून (कॉन्फिडेन्शियल) सुचना करता येते. त्यामुळे त्या व्यक्तीचे रक्त घेऊन चाचण्या केल्या जातात आणि जर काही रोग असल्यास त्या व्यक्तीला सांगीतले जाते. पण रक्त मात्र नंतर चाचण्या जरी 'निगेटिव्ह" आल्या असल्यातरी काळजी म्हणून वापरले जात नाही.

९/११ नंतर काही भारतीय संस्थांनी काही ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजीत केली होती. आम्हीपण बॉस्टनमधे ठेवायचा प्रयत्न केला. पण तो पर्यंत नको इतके रक्त मिळाल्यामुळे रेडक्रॉसने विनंती केली की तुर्त नको, लागल्यास विचारू!