वैषाली,

आपला लेख खूप आवडला. आईबद्दलची एक आठवण आठवली.

असंच एकदा मला आक्काने चिडवलं होतं की तू आईची नाहीच आहेस.. तू तर अशीच नाल्यातून वहात वहात आली होतीस आणि तिने तुला धरलं आणि घरात आणलं होतं ! याचा पुरावा म्हणून तिने माझ्या आणि आईच्या वर्णातला फरक समोर केला होता. माझी आई गोरी आणि मी काळी.. मी तडक बाबांकडे ( जे सुद्धा माझ्याचसारखे काळे ! की मी त्यांच्यासारखी काळी?!!! :D ) जाऊन 'माझ्यासारखीच काळी असेल अशी नविन आई आणा.. आत्ता... लग्गेच... ' असा जोरदार हट्ट केला होता, तोही साक्षात माझ्या आईच्या हजेरीत..! आईचं माझ्यावर प्रेमच नाही वगैरे वगैरे.. माझ्या विचारांना आणिक खतपाणी मिळालं होतं या नव्यानेच लावून दिलेल्या शोधामुळे. माझ्या या जगावेगळ्या हट्टाची बाबांना जबरदस्त गंमत वाटत होती आणि आईलाही. पहिल्यांदा त्यांना वाटलं की मी असंच काहितरी वाटलं म्हणून म्हणत असेन पण जेव्हा मी रडारड करून गोंधळ घातला आणि सगळं घर डोक्यावर घेतलं तेव्हा मात्र आई सिरीयस झाली आणि तिने विचारलं,"मीच जर काळी झाले तर मग चालेन का तुला तुझी आई म्हणून?" तिचा हा प्रस्ताव मला अजिबात आवडला नाही कारण त्यामुळे ती माझी अट पूर्ण करूनही 'माझी आई' उरणार नव्हती.. तिचं अस्तित्वच पुरतं बदलणार होतं.. तिला मी जसं पहिल्यापासून अनुभवलं तशी न उरता काहितरी वेगळीच होणार होती.. ती रागवत होती, शिक्षा करत होती हे सगळं मान्य आहे पण मी काही चांगलं करता मायेने थापही सर्वात आधी आणि न चुकता देत होती हे कसं विसरता आलं असतं?.. दादाआक्काला जरासं झुकतं माप देत असली तरी माझ्यासाठीही सायीचं दही बाजूला काढून ठेवत होती.. आणि शिवाय आक्काने सांगितलं त्यानुसार तर तिनेच तर मला नाल्यातून वहात जाताना पकडलं होतं आणि घरात आणलं होतं.. मग?.... खरंच का मला हवी आहे माझ्याचसारखी काळी असलेली नविन आई?.. हा प्रश्न मला पडला. माझ्या डोक्यात जबरदस्त वादळ उठलं आणि तेव्हाच बाबा मला म्हणाले,"चल रे बबड्या, रडू नको. आपण आत्ताच घेऊन येऊ चल तुझ्यासाठी काळी आई.." आणि त्यांनी शर्टपँट घालून तयार होत माझा हात धरला आणि निघाले. शप्पथ ! पाय उचलवत नव्हते माझे.. काहितरी अमूर्त, निराकार असं होतं जे मला मागे खेचत होतं.. नको जाऊस म्हणत होतं.. दरवाज्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि तिथून बाहेर पडणं शक्यच झालं नाही. हात सोडवून घेत परत आले पळत आणि भोकाड पसरून आईला बिलगून म्हणाले,"आई, आक्का म्हणते की मी तुझी नाही. नाल्यातून वहात आलेली आहे म्हणून काळी आहे. मी काळी आहे म्हणून का तू माझ्यावर प्रेम करत नाहीस? मी जशी आहे तशी नाही का चालणार तुला?" आईला हे सगळंच एकदम अतर्क्य आणि जबरदस्त धक्कादायक होतं. हे सगळं तद्दन खोटं आहे याबद्दल तिने माझी समजूत कशी घातली ते तिचं तिलाच माहिती.. पण आजही कधीकधी बाबा अगदीच मूडात आले तर विचारतात,"काय गं कधी आणायची मग आपण तुझ्यासाठी काळी आई?" आणि यावर मी आणि आई मनसोक्त हसून घेतो ! :,) ( हा हसताना रडणारा स्मायली आहे ! )

आई हे एक अजबच रसायन असतं.. एकवेळ पाण्याशिवाय जगणं मी पसंत करेन पण 'माझ्या' आईशिवाय........ कधीच.. कधीच.. कधीच नाही !