सचिन,
माफ करा पण मला वाटते इथे विचारांची गफलत होते आहे. पहिली गोष्ट म्हणजे बरेचसे संत विचारवंत होते आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांनी बुवाबाजीचा पुरस्कार कधीच केला नाही. विज्ञानवाद्यांचा आक्षेप आहे तो त्यांच्या नावावर चालणाऱ्या बुवाबाजीला. कुणाचाही उल्लेख अपमानास्पद रितीने होऊ नये हे बरोबर आहे. मला वाटते जाणीवपूर्वक असे करण्याचा कुणाचाही हेतू नसावा. पण हे होते ही खेदाची गोष्ट आहे.
त्याचबरोबर डार्विनसारख्या जिनीयस(याला कुणीतरी शब्द सुचवतील का?) शास्त्रज्ञाचा तुम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला आहे तेही मला बरोबर वाटत नाही.
थोडे उत्क्रांतीविषयी. हा सिद्धांत आता सर्वमान्य आहे आणि त्याचे बरेचसे पुरावे मिळालेले आहेत. उलटपक्षी उत्क्रांतीचा सिद्धांत मानला नाही तर जीवशास्त्रामधले सध्याचे बरेचसे संशोधन ठप्प पडेल. माणूसही उत्क्रांत होतो आहे. उदाहरणार्थ प्राण्यांचे दूध पचवण्याची यंत्रणा आधी माणसात नव्हती. आपण गाई-म्हशी पाळून दूध उत्पादन सुरू केल्यावर जनुकीय मार्गाने ती सुरू झाली. दुसरे उदाहरण म्हणजे आपण एकाच वेळी घास गिळणे आणि श्वास घेणे दोन्ही करू शकत नाही. हा भाषा विकसित झाल्यावर स्वरयंत्रणा उत्क्रांत झाल्याचा परिणाम आहे.
आधीच्याच लेखांमधले मुद्दे मांडायचे तर डोळस आणि चौकस दृष्टिकोन, सतत प्रश्न विचारण्याची आणि उत्तरे मिळवण्याची वृत्ती या सर्वांची नितांत गरज आहे. विज्ञानातील मला आवडणारी गोष्ट म्हणजे जर एखाद्या नियमाला अपवाद सापडला तर विज्ञान तो नियम बाद ठरवायला मागेपुढे पहात नाही. आईन्स्टाईनने सापेक्षता सिद्धांत मांडल्यावर न्यूटनसारख्या महान शास्त्रज्ञाचा नियम बदलावा लागला पण ते झाले. ह्याला म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन.
हॅम्लेट