जेव्हा जेव्हा श्रद्धा - अंधश्रद्धा हा विषय चर्चेला येतो तेव्हा तेव्हा, जमेल तेवढे कटू शब्द वापरून साईबाबा/गजानन महाराज/स्वामी समर्थ आदी लोकांचा उद्धार करणे म्हणजे आपण फ़ार मोठे विज्ञान वादी असा काहीसा गैरसमज सगळीकडेच दिसतो...मनोगतावर ते आहेच.
कटू शब्दांचा वापर, उद्धार आणि फार मोठे विज्ञानवादी असे असे शब्द ही आपली निवड असेल तर ते तसे आहेच. तर्कशास्त्राचे पोटीस बांधून जेंव्हा ही गळवे बरी होत नाहीत तेंव्हा अशा निर्घृण शस्त्रक्रियांची आवश्यकता असते. झोपेचे सोंग घेऊन डोळे मिटलेल्यांना जागे करण्यासाठी हळुवार शब्द कामाचे नाहीत. तेथे तडिताघातच पाहिजे!
लोकांनी श्रद्धा की अंधश्रद्धा जोपासावी हे काही साईबाबा किंवा गजानन महाराजांनी सांगितले नाही... त्या लोकांनी काही चमत्कारही करतो असा दावा केला नाही ... हा सगळा समाजातील इतर लोकांचा दोष की त्यांनी या लोकांच्या भोवती अशा रंजक कथा / चमत्कार गुंफ़लेत...
खरे आहे. साईबाबा किंवा गजानन महाराज आज अस्तित्वात नाहीत. त्यांच्या नावावरचा मासमॅनिया अद्याप कमी होत नाही, त्यांच्या नावाचा हँगओव्हर अद्याप उतरत नाही, हीच तर खरी व्यथा आहे!
आणि या लोकांचे चुकले काय हे एका जुन्या चर्चेचा संदर्भ देऊन सांगतो. सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यात टिळकांचे काय चुकले या चर्चेत मी हे सांगितले होते. कुणाच्या हातात आपण काय देतो आहोत याचे भान झुंडप्रमुखांना असणे आवश्यक असते. आपण कोणत्या समाजात आहोत, त्यांना आपण काय करायला सांगतो आहोत आणि त्याचे भविष्यात काय स्वरूप होईल हे ज्याला कळत नाही, त्याने कुणालाही काहीही करायला सांगू नये. अर्थात हे सामान्य, 'साऊन्ड स्टेट ऑफ माईंड' मधील माणसाला लागू आहे. अंगावर रेशमी वस्त्र घातले की ते भिरकावून देणे, दिवसनदिवस अंघोळ न करणे, उकीरड्यावरील खरकटे अन्न खाणे, अगम्य शब्द सतत बोलत रहाणे अशा पारलौकिक वर्तनाच्या महात्म्यांकडून अशा तर्कसंगत वर्तनाची का अपेक्षा करावी?
अहो, साधे बीजगणीत सोडवताना सुद्धा आपण जी अस्तित्वात नाही ती 'क्ष' संख्या "मानतो", त्याशिवाय एक पायरीही पुढे जाणे शक्य होत नाही, मग जीवनात तुम्ही असे दिशाहीन चालूच शकणार नाही.
उदाहरण चुकीचे आहे. 'क्ष' च्या जागेवर 'य' जरी मानले तरी सिद्धांतात फरक पडत नाही. गजानन महाराजांचा जागेवर जॉर्ज फर्नांडीस यांची आराधना करा म्हटले तर (पडणाऱ्यांना)फरक पडतो. 'गण गण गणात बोते' च्या ऐवजी 'धूम मचा ले धूम मचा ले धूम' असे म्हटले तर (पडणाऱ्यांना) फरक पडतो.
आजही मोठमोठे डॉक्टर, जेव्हा त्यांना ज्ञात असलेले प्रयत्न करूनही रुग्णात काही फ़रक पडत नाही तेव्हा म्हणतात की यापुढे सगळे "त्याच्या भरवशावर" (देव) ... असे का?
हीच तर खरी ट्रॅजेडी आहे. पण हा 'बेडसाईड मॅनर्स' चा भाग असू शकतो. 'त्या' च्यावर विश्वास ठेवा असे म्हणणे हे त्या रुग्णाच्या नातेवाईकांना दिली जाणारी एक मानसिक ट्रीटमेंट असते. रुग्णाचे काय व्हायचे आहे ते होईलच, किमान त्याच्या नातेवाईकांना तरी मानसिक धक्का बसू नये, म्हणून असे म्हणण्याची पद्धत असते.
उत्क्रांती ... डार्वीनबाबा ने सांगितले की माणुस आधी माकड होता आणि त्याची उत्क्रांती होत होत तो माणुस झाला...
मग इतकी वर्षं झाली ह्या उत्क्रांतीचे पुढे काय झाले? माणसाच्यात आजुन बदल घडून पुढे दुसरा प्रगत मानव /प्राणी का तयार झाला नाही... का आजुन माणसाचा एखादा अवयव या उत्क्रांती मध्ये गळून पडला नाही की जो फ़ारसा उपयोगी नाही / की नवीन अवयव आला नाही जो आजच्या जगात वावरण्यासाठी/जगण्यासाठी अधिक सोयीचा असेल?
उदाहरण चुकीचे आहे. उत्कांती अशी रातोरात होत नसते. एकेक गुणधर्म बदलायला हजारो वर्षे लागतात. काही लाख वर्षे थांबा, करंगळी नसलेली. नखे नसलेली, केस नसलेली माणसाची आवृत्ती पहायला मिळेल!
विज्ञानाचे कितीही बाळकडू पाजले तरी माणसाला कुठेतरी श्रद्धा ही ठेवावीच लागते. त्याशिवाय त्याचे जगणे म्हणजे, तुफ़ानात भरकटलेल्या होडी सारखीच होईल.
अशा भरकटण्यापासून वाचवणे हेच विज्ञानाचे कर्तव्य आहे. विज्ञान आणि विज्ञाननिष्ठांचा हाच प्रयत्न सुरु असतो!
विज्ञानाची मर्यादा वारंवार विज्ञानानेच सिद्ध केली असताना हे लोक मात्र जगातील प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक काटकोन, चैकोनात मोजण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
विज्ञानाने आपली मर्यादा किमान मान्य तरी केली आहे. श्रद्धा असावी, नव्हे , असलीच पाहिजे म्हणणारे आपली मर्यादा मान्यही करायला तयार दिसत नाहीत! मग अधिक अहंमन्य कोण?
जाताजाता: 'मनोगत' वरील वयाने ज्येष्ठ मंडळी आत्मपरीक्षणाला तयार, अधिक विज्ञानवादी होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. 'मला संपूर्ण नास्तिक कसे होता येईल?' असा प्रश्न पडलेले लोक वयाने चाळीशीच्या पुढचे आणि 'श्रद्धा नसेल तर हा भवसागर तुम्ही तरून कसा जाणार? जगण्याला अर्थ हवा असेल तर कुठले तरी बाबा / महाराज यांचा काष्टा धरा, नाहीतर बुडून जाल!' असा इषारा देणारे तिशीतले हे मनोरंजक आहे. नारळीकरांचे म्हणणे बरोबर आहे असे तर यातून सिद्ध होत नाही ना सर्किटराव?