विद्यार्थ्यांची एकांगी वाढ टाळण्यासाठी वैज्ञानिक व आध्यात्मिक ज्ञान गरजेचे - डॉ. विजय भटकर

पुणे, ता. २४ - सध्याच्या शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांची एकांगी होत असलेली वाढ टाळण्यासाठी त्यांना वैज्ञानिक आणि आध्यात्मिक ज्ञान मिळायला हवे, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी आज येथे व्यक्त केले. .....
...... विश्‍वशांती केंद्र व एमआयटी संस्थेच्या वतीने आयोजित अकराव्या संत ज्ञानेश्‍वर तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्‌घाटन आज डॉ. भटकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. एमआयटीचे संचालक डॉ. विश्‍वनाथ कराड, डॉ. प्रदीप तारणेकर महाराज, प्रा. मंगेश कराड, डॉ. ए. ए. कुलकर्णी, प्रा. ए . के. पाठक व प्रा. सुधीर राणे या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार दास अध्यक्षस्थानी होते.

डॉ. भटकर म्हणाले, ""गणित हे सर्व शास्त्रांचे मूळ आहे. गणिताच्या आधारेच वैज्ञानिक निष्कर्ष उभे करता येतात; तसेच आध्यात्मिक सिद्धान्तही शोधता येणे शक्‍य आहे. मात्र, सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक असे शिक्षण मिळत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. हे टाळून चांगला नागरिक घडविण्यासाठी शिक्षण व्यवस्थेने मुक्त स्वरूप धारण करण्याची वेळ आता आली आहे.'' डॉ. दास म्हणाले, ""मानवतेला महानता मिळवून देण्याचे काम संत ज्ञानेश्‍वर व तुकाराम यांनी केले आहे. त्यांनी प्रथम स्वत:चे आचरण उच्च पदाला नेले व त्यानंतर इतरांना मार्गदर्शन केले.''