दोन्ही भाग एकत्र वाचले. लेख आवडला.
तांत्रिक माहिती सोप्या मराठी भाषेत समज़ावून सांगतानाही प्रमाणभाषेतील रूढ तांत्रिक शब्दांना धक्का लागलेला नाही हे पाहून आनंद वाटला. आकाशात उड्डाण करण्याच्या सुप्त मानवी इच्छेपोटी झालेले प्रयत्नही उधृत केल्याने या लेखासाठी छोटीशी ऐतिहासिक पार्श्वभूमीही तयार झाली आहे.
स्पष्टीकरणाच्या तुलनेत चित्रांतून स्पष्ट होणाऱ्या गोष्टी अंमळ त्रोटक वाटत आहेत. संपूर्ण स्पष्टीकरण संलग्न चित्रांच्या संगतीने छोट्या छोट्या परिच्छेदांमध्ये विभागून लिहिल्यास अधिक परिणामकारक होईल, असे मला वाटते.
अवांतर - किटी हॉक, (आउटर बँक्स, नॉर्थ कॅरोलायना) ही ज़ागा माझ्या राहत्या ज़ागेपासून काही अंतरावर (साधारण ३-१ तास?) आहे. अटलांटिकचे हिरवे पाणी, फ़िकट शुभ्र-तपकिरी वाळू अशा निसर्गसौंदर्याने ही ज़ागा नटलेली आहे. राइट बंधूंच्या विमानोड्डाणाच्या ज़ागी एक स्मारक नि त्याबद्दलची माहिती देणारे स्त्रोत यांमुळे या ज़ागेला ऐतिहासिक महत्त्वही आले आहे. त्या ऐतिहासिक उड्डाणाच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९८२ सालापासून नॉर्थ कॅरोलायना राज्यातील गाड्यांच्या नंबरप्लेट्सवर "फ़र्स्ट इन फ़्लाइट" लिहिलेले असून राइट बंधूंच्या त्या ऐतिहासिक विमानाचे चित्रही असते. याबद्दलची विकिपिडियावरील अवांतर माहिती वाचनीय आहे.