वरती काही लोकांना पोस्ट कार्डाला मराठी सुचवा ही सूचना हास्यास्पद वाटते हे वाचून आठवले.

जर्मन लोक हे अनेक वैज्ञानिक संज्ञांना अट्टाहासाने जर्मन शब्द शोधतात आणि वापरतात. ऑक्सिजन, हायड्रोजन, एक्स रे अशा अनेक गोष्टींना जर्मन भाषिक पर्याय आहेत आणि ते वापरले जातात. ह्यातला काही गोष्टींचा शोध जर्मनीत लागला आहे (उदा. एक्स रे) पण बाकी गोष्टी देशानी शोधून काढल्या. तरी जर्मन लोकांनी ते शब्द तसेच्या तसे उचलले नाहीत. तीच गोष्ट चिनी व जपानी भाषेची.
  परकीय संकल्पनांना एखाद्या भाषेत प्रतिशब्द निघतात की नाही हे माझ्या मते खालील गोष्टींवर अवलंबून आहे.

१. त्या भाषिक लोकांचे आपल्या भाषेवरील प्रेम व त्या भाषेबद्दलचा अभिमान.  मराठी लोक इथे कमी पडतात. मराठी लोकांना आपल्या भाषेबद्दल बराचसा न्यूनगंड आहे. तमिळ व बंगाली लोक आपापल्या भाषेबद्दल कितीतरी जास्त अस्मिता दाखवतात.

२. परकीय भाषा किती रुजली आहे. चिनी भाषा व इंग्रजी ह्यात खूप फरक आहे. इंग्रजी शब्द तसाच्या तसा चिनीत लिहिताच येत नाही. त्यामुळे त्यांना चिनी प्रतिशब्द शोधावाच लागतो. इथेही मराठीला प्रतिकूल परिस्थिती आहे. भारतात इंग्रजी रुजली आहे आणि तिला खूप प्रतिष्ठाही आहे. त्यातील शब्द, ध्वनी मराठीत आणायला काहीच अडचण होत नाही. उलट ऍ आणि ऑ ही चिन्हे निर्माण करून आपण हे अधिकच सोपे केले आहे.

३. प्रतिभाशाली साहित्यिक. सावरकरांसारखे लोक ज्यांचे दोन्ही भाषेवर प्रभुत्त्व होते त्यांनी अनेक शब्द निर्माण केले. जसे महापौर, संपादक, स्तंभ इत्यादी. त्याही बाबतीत मराठी आज मागे आहे.

अशा कारणांमुळे मराठी प्रतिशब्द बनणे अवघड आहे असे माझे मत आहे.