अंजूताई,
यमनसारख्या रागातली गाणी मिळणे सोपे असते कारण नुसते स्वर आले की जवळजवळ राग निर्मिती झाली असे जे राग असतात त्यापैकी यमन आहे (आणखी एक उदा. मालकंस).
पण केदार अशा रागांपैकी आहे की ज्यात विशिष्ट स्वरसंगती (पकड-चलन) प्रकट झाल्याशिवाय रागाची ओळख पटत नाही. केदारात दोन मध्यम जसे (कित्येकदा एकामागून एक सुद्धा) ठराविक पद्धतीने लागतात तसे आल्याशिवाय तो केदार आहे हे ठरत नाही -
[उदा. सा म ऽऽ प, पधनीधप, पध प म]
त्यातही एखाद्या म वर किंवा दुसऱ्या एखाद्या स्वरावर थोडाही भर वाढला की रागच बदलू शकतो. हेच स्वर वेगळ्या प्रकारे येणारे इतरही राग आहेत (उदा. मारुबिहाग).
बरे, असे बंधन संगीतकारालाही जाचक वाटू शकते, त्याच्या कल्पनाशक्तीला पुरेसे स्वातंत्र्य मिळत नाही. तीन मिनिटात अशा स्वरसंगती किती वेळा घेणार, तोचतोचपणा येणार नाही का? म्हणून सुगम संगीतात असल्या रागांवर फार गाणी मिळत नाहीत.
मिलिंदाने चांगली उदाहरणे दिली आहेत.
आणखी एक म्हणजे "अवघाची संसार" या जुन्या मल्टिस्टार चित्रपटात "आज मी आळविते केदार" असे सांगूनसवरून केदारातले गाणे आहे. 
गंमत म्हणजे राहुलदेव बर्मन सारख्या पाश्चात्य ढंगाच्या पुरस्कर्त्याने (बहुधा "बर्निंग ट्रेन") "पल दो पल का साथ हमारा, पल दोऽऽ पल के याराने हैं" मध्ये नेहमीचा केदार पुष्कळशा शुद्ध स्वरूपात दाखवला आहे.
केदारातही प्रकार आहेत. आपला प्रचलित केदार हा चांदनी केदार असावा असे वाटते. बाकी तात्या व डॉ. राजन पर्रीकर जाणोत.
पर्रीकरांचे जालस्थळ (SAWF) पाहिले का? तिथे अनेक उदाहरणे मिळू शकतील.

पण सावध रहा! असे अमुक गाणे अमुक रागात आहे असे म्हणणारे लोक बरेच वेळा एखादी कुठली तरी स्वरसंगती त्या गाण्यात पहातात आणि त्याला हा हा राग म्हणतात. ते सर्वांनाच पटेल असे नाही.
दिगम्भा