प्रशासक महाशय, धोरण घोषित करण्याखातर आपले हार्दिक धन्यवाद!
आपल्या ह्या धोरणामुळेच जे इतर संकेतस्थळांना साधले नाही ते आज इथे साधलेले दिसून येते.
केवळ अमेरिकेतील, विदेशातील, पुण्यामुंबईतील, शहरी, आपापसांतील अशाप्रकारच्या स्थलकालबंधित विशेषणांनी कलुषित न होता 'विश्वमराठी' अभिव्यक्तीचे विस्तीर्ण व्यासपीठ आपण निर्माण करून, शाबूत ठेऊ इच्छिता! आमचेही इप्सित ह्यापरता अधिक काय असू शकेल?
आजच लोकसत्तामध्ये आलेला एक लेख मराठीला विनाकारण कमीपणा आणण्याचे काम प्रचारकी थाटात करीत आहे. त्यांनी एकदा आपले हे 'मनोगत' इथे येऊन पाहावे. म्हणजे आधुनिक मराठीला लाभलेल्या सशक्त आश्रयदात्यांची त्यांना यथातथ्य कल्पना येईल. आजकालच्या वर्तमानपत्रांतील अशुद्धलेखन, उसंडु, अखंडतेचा अभाव व समन्वयाची वानवा जोपासणाऱ्या पोटभरू पत्रकारांकडून मराठीला सशक्त आश्रय मिळेल/मिळू शकेल ह्यावर माझातरी विश्वास राहिलेला नाही.
आपल्या शुद्धलेखनाबाबच्या तळमळीचे, शुद्धिचिकित्सकाचे, शब्दसंग्रहांचे आणि एकूणच मराठी भाषेप्रतीच्या कळकळीचे कौतुक करावे तेवढे थोडे. खुद्द महाराष्ट्रातील सरस्वतीमंदिरांना, महाराष्ट्र शासनाला जे साधले नाही, करावेसे वाटले नाही ते ते मायबोलीच्या उन्नयनाचे कार्य, फावल्या वेळात करूनही आपण समर्थपणे साधलेत. माझा आपल्या ह्या सत्कार्यास सहर्ष पाठिंबा आणि त्रिवार शुभेच्छा!
आपल्या धोरणातील मुक्तपणा, पारदर्शिता, व्यापकता, सशक्तता आणि ठामपणा मनोगतास आणि मराठीस परम वैभवास पोहोचवो हीच प्रार्थना!