१९२३ चा काळखंड असावा. युध्दामुळे असेल अथवा परकियांच्या जोखडामुळे आपल्या सनातन संस्कृतीचा र्‍हास होत आहे असे एका सत्पुरुषाने पाहीले. याला उत्तर म्हणुन हिंदुधर्माचा संदेशरुप असलेला ग्रंथ, श्री.गीता घरोघरी गेली पाहिजे असे त्याने ठरविले.
सेवाभावी वृत्तीच्या त्या गृहस्थाने, श्री. जयदयाळ गोयंदका याने, गीताच्या पुस्तकाचे मुळ संस्कृत मध्ये स्वताच्या भाडयाच्या घरात स्वखर्चाने प्रकाशन केले. ती पुस्तके एका हातगाडीवर ठेवुन गावोगावी जावुन तो 'न लाभ न हानी' या तत्वावर विक्री करु लागला. त्यातुन जो काही पैसा जमा झाला त्यातुन परत काही गीतेच्या प्रती छापल्या आणि त्याच पध्दतीने गावोगावी जावुन विकू लागला. हे चक्र चालु राहीले, गीतेच्या तत्वाचाच प्रचार आणि प्रसार हे आपले जीवीत कर्तव्य ठरविल्या प्रमाणे अतिशय प्रामाणिकपणे आणि व्यावहारीक मार्गाने गीतेचा प्रसार होवू लागला.
जो माणुस स्वतःवरच बंधने लादुन घेतो त्याची प्रगती प्रचंड होत जाते असा जगाचा अनुभव आहे. त्याच प्रमाणे गोयंदका यांनी कोणत्याही दान -देणगी न घेण्याची, त्याचबरोबर गीतेच्या पुस्तकामध्ये कोणतीही जाहिरात न करण्याची अट स्वतावरच टाकुन घेतली. ( सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना आणि पुस्तक प्रकाशन क्षेत्रात काम करनार्‍यांना या दोन्ही शिवाय काय होईल याची पुर्ण कल्पना येईल.). हळुहळु गीताप्रेसचा व्याप वाढु लागला, त्याच बरोबर लोकांनी त्याना उपनिषद, पौराणिक कथा, संत साहित्य प्रकाशित करण्याची विनंती केली. आपल्या उपक्रमाला याचा उपयोग होईल या कल्पनेतुन त्यांनी कल्याण( हिंदी ) मासिकाची सुरवात केली. 
काळाच्या ओघात गीताप्रेस इतरही भाषांमध्ये अध्यात्मिक साहित्याचे प्रकाशन करीत असतात, अर्थातच कमी किमंतीमध्ये उत्कृष्ठ देण्याचा हव्यास ठेवुनच.
मागच्या वर्षी गीताप्रेसने १३ लाख टन कागद वापरला, त्यांची उलाढाल ही १३ कोटी रुपयांची होती. याच बरोबर वेदांचे अध्ययन , आयुर्वेदावर संशोधन, पौराणिक कथांचा अभ्यास, भाविकांसाठी भव्य धर्मशाळा ( ३००० लोकांची एकावेळेस सोय होवु शकते) इत्यादी प्रकल्प चालत असतात.
एका सतविचाराने प्रेरीत झालेला माणुस काय काय करु शकतो त्याची ही कथा आहे असे म्हंटले तर ते योग्यच राहील असे मला वाटते.    

द्वारकानाथ