श्री. दिगम्भा यांनी सर्वसामान्यांना शास्त्रीय संगिताची माहिती देण्याचा स्तुत्य उपक्रम केला आणि त्यांत बरेच लेख लिहिले.  नुसते लेख वाचून सहसा गाण्याचे ज्ञान होत नाही ही गोष्ट खरी आहे.  आणि ते तसे होऊ शकेल असे कोणीहि म्हटले नाही.  तरीहि कॅसियो घेऊन मी शास्त्रीय संगिताची तोंडओळख करतो असे कोणी म्हणणे हे पण वावगे नाही.

शास्त्रीय संगिताला नव्या तंत्रज्ञानाची मदतच होऊ शकेल.  तंत्रज्ञानाने संगितात लुडबूड करू नये हे म्हणणे योग्य नाही.  तंत्रज्ञान आणि संगीत एकत्र गुण्यागिविंदाने राहण्यास अजिबात हरकत नाही.  किंबहुना ते तसे राहातच आहे ही वस्तुस्थिति आहे.

माझ्या वैयक्तिक अनुभवाची काही उदाहरणे देतो. 

वाद्य वाजविणाऱ्याला एकाच वेळी वाद्य वाजवताना तंबोरा वाजविणे शक्य नसते.  अशा वेळी सराव किंवा नुसतेच वाद्य वाजवताना जोडीला आवश्यक असा सुरांचा भरणा कसा होणार?  १९६८ साली मी मधुभाईंकडे डोंबिवलीला व्हॉयोलिन शिकत होतो. तेव्हा मधुभाई पायाने पेटीचा भाता दाबून स्वर चालू ठेवायचे आणि हाताने व्हॉयोलिन वाजवून मला शिकवायचे.  त्या वेळेस माझ्याबरोबर माझे सहाध्यायी श्री. भालोदे हे पण शिकत होते.  त्यावेळेस बाल्यावस्थेत असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सचे ते तंत्रज्ञ होते.  त्यांनी तेव्हा एक प्रयोगात्मक इलेक्ट्रॉनिक्स सुरपेटी केली.  त्यामध्ये एकाच वेळी फक्त सा आणि प असे दोनच स्वर वाजत.  त्या स्वरांची जात सुद्धा फार गोड नव्हती, पण मधुभाईंना तो प्रयोग खूप आवडला आणि त्यामुळे त्यांना पायाने पेटीचा भाता हलविण्याची कसरत टाळता आली.  आम्ही नंतर ती इलेक्ट्रॉनिक सूरपेटी घेऊनच "गाणे" शिकलो.  त्या पेटीचे ते २ सूर स्थिर सुद्धा राहात नसत.  थोड्यावेळाने आतल्या तारांच्या जाळ्याचे तपमान बदलले की सूरसुद्धा थोडा बदलायचा.  मग परत तो सूर ठिकाणावर आणणे हे सुद्धा मधुभाई सहन करीत होते.*

त्याच तंत्रज्ञानाचा आता केव्हाढा विकास झाला आहे. हल्ली सर्रास सर्व गायक/वादक इलेक्ट्रॉनिक तंबोरा मैफिलीमध्ये वापरतात.  त्यांच्याकडे तंबोऱ्याची जोडीसुद्धा असते पण शिवाय सतत चालणारा सुरांचा भरणा त्या तंत्रज्ञानामध्ये विकसित झालेल्या सूरपेटीमुळे सर्वांना उपयोगी ठरतो.  याचा अर्थ असा नाही की तंबोरा वापरणारे तेच श्रेष्ठ आणि इलेक्ट्रॉनिक सुरपेटी वापरणारे दुय्यम.  ते दोघे एकत्र काम करू शकतात.

सरावासाठी आता उत्तम विजेचा तबला पण मिळतो हेसुद्धा सगळ्यांना माहिती आहे.

त्यावेळेला स्वर कसा आणि किती बदलला हे लक्षात आणून देऊन मधुभाईंनी आमचे सुरांचे ज्ञान आणखी पक्के केले.  (मधूभाईंनी चांगला तंबोरा कसा लावायचा आणि स्वर कसे शोधायचे हे शिकवले याचे वर्णन मी मागे एकदा केले होते)

दुसरी गोष्ट १९८१ सालची.  त्यावेळेला कॅसियो आणि यामाहाचे की-बोर्ड नुकतेच आले होते.  बहारिनमध्ये आमच्यात खूप हौशी आणि गुणी गायक वादक होते. माझे हौशी कलाकार स्नेही श्री. बेलवलकर तो की-बोर्ड वापरून आम्हाला साथ करायचे.   तिथे दर आठवड्याला भरणाऱ्या आमच्या गाण्याच्या बैठकी हा आमचा त्या वाळवंटात मोठा आनंदाचा ठेवा होता.  तेव्हा श्रीमति प्रभाताई आणि भीमण्णांच्या साथीकरता आलेल्या श्री. वालावरकरांनी बहारिनला माझ्या घरी तो की-बोर्ड वाजवून त्याला पावती दिली होती.  आता तर त्यावेळेपेक्षा अधिक समृद्ध तंत्रज्ञानाने अशा की-बोर्डातून फारच सुरेख सूर निघतात.  तसेच त्यात मींडसुद्धा घेता येते.  त्यामध्यी सूक्ष्म रितीने स्वर कमीजास्त करता येतो त्यामुळे हे की-बोर्ड तुम्हाला पाहिजे तसे अचूक स्वराला लावू शकता.  पेटीमध्ये ते करता येत नाही.  दुर्दैवाने हे की-बोर्ड जपानमध्ये तयार होतात आणि जास्त करून पाश्चात्य संगिताला लागणाऱ्या बाबींची मागणी पुरवतात.  पुढेमागे भारतीय संगिताची माहिती असलेला संशोधक त्यात आला तर आपल्या संगिताला लागणाऱ्या गोष्टी, ताल, स्वर वगैरे ते त्यांत उपलब्ध करू शकतील.

सांगायचा मुद्दा असा की तंत्रज्ञान हे वापरणे माणसाच्या हातात आहे.  ते डोळसपणे वापरले तर त्याचा उपयोगच होईल.

तात्या आणि मिलिंदराव या दोघांना मी माझे मित्र समजतो, पण त्यांनी इथे एकेमेकांशी जी चर्चा चालवली आहे ती स्वतःची भूमिका सोडणार नाही अशा हटवादीपणाने चालवली आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.  अर्थात हा माझा दृष्टिकोण आहे.  तो चूकहि असेल.

मला राहवले नाही म्हणून लिहिले.  आता प्रतिसादाच्या माऱ्याला तयार आहे.

कलोअ,
सुभाष