इराक युद्धात अमेरीकेचे बरेचसे सैनीक हे "नॅशनल गार्ड" असलेले आहेत. म्हणजे ते नेहेमीचे नागरी जीवन जगत असतात पण त्यांना युद्धाच्या वेळेस बोलावले जाऊ शकते.
आमच्याकडचा असा एक कामगार आणि एकदा एक इंजिनीयर हे असे बोलावले गेले होते. त्यांच्यासाठी, त्यांनी जायच्या आधी लोकांनी मोठी पार्टी केली आणि शुभेच्च्छा दिल्या. सुदैवाने दोघे ही परत सुखरूप आले तेंव्हा पण त्यांचे असेच स्वागत झाले (वाढवून गौरव नाही). याचा एक परीणाम म्हणजे त्यांच्या कुटूंबियांना खूप बरे वाटते आणि त्या व्यक्तिलाही नैतिक आधार मिळतो - की - भले राजकारणी चोर असतील, समाजात बरे वाईट असेल पण आपले देशासाठीचे काम आणि नागरी/कौटूंबिक आयुष्यापासून लांब राहायचा त्याग निदान आजूबाजूची माणसे तरी जाणत आहेत.
मी तसेच पाहीले आहे की प्रसार माध्यमे पण जे सैनीक शहीद होतात त्यांची बातमी छापतात, माहीती देतात. दुर्दैवाने वरील (मे. पितांबऱ्यांच्या) बाबतीत फक्त मराठी वृत्तपत्रे आणि इंडीयन एक्सप्रेस मधे बातमी आल्याचे जाणवले. हिंदूमधे त्रोटक आणि आझाद काश्मिरच्या बाजूने असलेल्या दोन वृत्तपत्रात बातमी दिसली. पण बाकी मुंबईच्या पत्रांमधे आली असे दिसले नाही (कदाचित चूक असेल तर तसे सांगा), जणू काही हा फक्त मराठी माणूस मराठी माणसासाठी मेला... एरव्ही कुठल्यातरी पाश्चिमात्य बायकांची असंबद्ध छायाचित्रे वेबसाईटवर ठेवणाऱ्या टाईम्सला, अर्धातास (निदान एथे बघताना) झी न्यूज मधे "मिड-डे" मधे राहूल महाजन ने काय बायकोला केले एव्हढीच बातमी सांगणाऱ्या झी नेटवर्क्सला अशा हुतात्म्यांबद्दल काही वाटू नये हे दुर्दैव....
एक गोष्ट पाहून बरे वाटले (विशेष करून मी पण ठाण्याचा असल्याने) की निदान त्यांच्या अंत्यदर्शनाला अनेक जण गेले. या गोष्टिला खूप महत्त्व आहे. असे अनेक जण महाराष्ट्रातून जात असतात आणि दुर्दैवाने कधी कधी परत ही येत नाहीत... पण नाही चिरा, नाही पणती म्हणत त्यांच्या कडे दुर्लक्ष करणे योग्य वाटत नाही.
९/११ मधे जे ३००० लोकं गेली त्यांची नावे कितीही वेळ लागला तरी म्हणली गेली. त्याचे सुक्ष्म परीणाम सामान्य माणसाच्या मानसिकतेवर आणि स्वतःचा देश , माणसे यांच्यावर प्रेम तयार करत असतात. आपल्याकडे ज्या लोकांमुळे संसद वाचली ती किती पोलीस अधिकारी होते तो आकडाचा काय पण कोणच्या तारखेला आणि कोणच्या वर्षी संसदेवर हल्ला झाला हे तरी आपण अथवा माध्यमे लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो का?
कृपया वरील मुद्दा अमेरिका शहाणी आणि आपण वेडे असल्या अर्थाने लिहीला आहे असे समजून वाचू नका...