आजचा डॉक्टर एक दलाल होत चाललाय.
ही दलाली सगळ्याच डॉक्टरांच्या मनाविरुद्ध आहे का? डॉक्टरांनाच औषधे निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून काही अपेक्षा नसतात का? देऊ केलेली सँपल्स - ते एकवेळ ठीक आहे म्हणा, किमान ती औषधे रुग्णांना तरी देता येतात - निरुपयोगी गिफ्टस ठामपणे नाकारणारे डॉक्टर्स किती असतील? औषधे तयार करणाऱ्या कंपन्या सेमिनारच्या नावाखाली डॉक्टरांना कुठेकुठे नेऊन आणतात, त्यांच्या खाण्या (आणि विशेषतः) पिण्याची सोय करतात, मग अशा कंपन्यांची औषधे महाग असली तरी ती प्रिस्क्राईब न केल्यामुळे येणारा चोरटेपणा टाळण्यासाठी डॉक्टर्स ती लिहून देतात. कंपन्यांचा उद्देश साध्य होतो. जितकी मोठी कंपनी, तितका तिचा भपका अधिक, की तितकी तिच्या उत्पादनाची किंमत अधिक. रॅबोप्रेझॉलसारख्या चलती असलेल्या मोलेक्यूलचे उदाहरण घ्या. हे उत्पादन नव्याने तयार करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या हे उत्पादन कितीतरी अधिक किमतीत नव्याने बाजारात आणण्याच्या योजना आखताहेत, तरीही त्यांचा 'मार्केट शेअर' वरच रहाणार. सामान्य माणूस डॉक्टरने लिहून दिलेली औषधे घेतो. तो मोलेक्यूल कुठला आहे, तो मोलेक्यूल तयार करणाऱ्या दुसऱ्या कोणत्या कंपन्या आहेत, त्या उत्पादनांची किंमत काय आहे, हे सगळे सामान्य माणसाला आपल्या आवाक्याबाहेरचे वाटते- ते तसे नसते हा भाग वेगळा - त्यामुळे डॉक्टरने लिहून दिलेली औषधे वाट्टेल त्या किमतीला विकत आणून घेणे एवढा एकच पर्याय शिल्लक रहातो. परिणामी कंपन्यांचे फावते.
तीव्र इच्छाशक्तीने अशी प्रलोभने नाकारणे, औषधे लिहून देताना त्यांच्या किंमतीचा विचार करणे आणि गळ्यात पडलेल्या भेटवस्तू दान करून अपराधीपणाची भावना झटकून मोकळे होणे असे काही डॉक्टरांना करता येईल असे वाटते. ग्राहाकांनी आपला माहितीचा हक्क बजावणे आणि अनास्था सोडणे एवढे जरी केले तरी बराच फरक पडू शकेल.