आम्ही गझलकार धरून एकूण १२ जण असावेत. संगीता जोशी, मीनल बाठे, अविनाश सांगोलेकर, दीपक करंदीकर आणि मी एव्हढे गझलकार होते. कार्यक्रमाची प्रसिद्धी वर्तमानपत्रांत झाली नाही, हे एक कारण असावे. गंना(जोगळेकर) आणि मश्री(दीक्षित) तसेच माधवराव पटवर्धनांचे चिरंजीव, माधवरावांवर ज्यांनी अभ्यासू ग्रंथ लिहिला आहे ते सु. रा. चुणेकर आवर्जून उपस्थित होते. फारसे लोक आलेले नाहीत हे बघून आणि असलेले लोक जाऊ नयेत म्हणून गंनांनी मागचा दरवाजा बंद करावा असे मिष्किलपणे सुचवले.

अविनाश सांगोलकर आणि संगीताबाईंनी गझलेवर आपले विचार मांडले. सभागृहाच्या परंपरेला साजेसे असे प्रत्येकाने भाषण दिले. म्हणजे किमान ३० मिनिटे. आम्ही एकमेकांना भरपूर दाद दिली. (ह्यावेळी सभागृहात साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष फोटोरूपात तिथे हजेरी लावून होते, हे सांगायचे विसरलो.) थोडक्यात कार्यक्रम उत्तम झाला.

हा माझा खऱ्या अर्थाने दुसरा मुशायरा, कविसंमेलन. असा अनुभव गाठीशी आला हे उत्तम झाले. ह्यानिमित्ताने गंनाशी आणि मश्रींशी बोलणे झाले. त्यांनी माझी आस्थेने विचारपूस केली. गंनांचे बोलणे ऐकत राहावेसे वाटते. प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट असतो. शब्द अगदी चावूनचावून बोलतात.

चित्तरंजन