इथे दिलेले प्रकार हे "त्रासदायक" सदरात मोडणारे आहेत, पण यापेक्षाही भयंकर प्रकार परदेशी पर्यटकांबरोबर घडू शकतात.

परदेशातील वाहिन्यांवर सतत दाखवल्या जाणाऱ्या "इन्क्रेडिबल इंडिया" च्या अवास्तव जाहिराती आणि भारताच्या अविश्वसनीय प्रगतीच्या बातम्या पाहून भारताविषयी परदेशी लोकांच्या मनात आकर्षण निर्माण होते आहे. पण वास्तवात अजूनही भारत परदेशी पर्यटकांसाठी सुखावह असणे दूरच राहिले, सुरक्षितही नाही असेच म्हणावे लागेल. माझे कोणीही परदेशी सहकारी भारतात जात असतील तर इतर माहितीबरोबरच मी त्यांना सावध राहण्याचा सल्ला देतो.

अर्थव्यवस्थेचे आकडे काहीही सांगोत, चीन किंवा इतर पूर्व आशियाई देशांपेक्षा भारत बऱ्याच गोष्टींमध्ये मागे आहे. मूलभूत सोयी (इन्फ्रास्ट्रक्चर) हे एक उदाहरण म्हणून घेता येईल. पण सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपणा भारतीय लोकांची मानसिकता. सर्वच पातळ्यांवर प्रामाणिकपणाचा अभाव, सर्रास चालणारे फसवणुकीचे प्रकार हे आपल्या अंगवळणी पडले आहेत पण पाश्चात्यांना (म्हणजे त्यांच्या सध्याचा पिढीला) ह्याची सवय नाही.

जाहिरातींमध्ये निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय भारत पाहून इथे येणाऱ्याला झोपडपट्ट्या, अस्वच्छता, खराब रस्ते आणि प्रचंड गर्दी हेच दिसते. सर्वसामान्य भारतीय लोक या सर्वाला थेट जबाबदार नाहीत पण विकासाच असमतोल, सर्व पातळ्यांवर भ्रष्टाचार, गरीब-श्रीमंतांमधील वाढते अंतर या सर्व गोष्टींना अप्रत्यक्षपणे आपण सर्व जबाबदार आहोत.

हे नकारात्मक वाटू शकेल पण हे नाकारता न येणारे वास्तव आहे.

अवांतर -
भारताच्या आर्थिक प्रगतीमुळे भारतीयांची मानसिकता तपासणारी बरीच सर्वेक्षणे होत आहेत, त्यातील काही निष्कर्ष विशेष लक्ष देण्यासारखे आहेत. 

१. चांगल्या गोष्टींची बढाई आणि दोष झाकून ठेवणे (नुसते दोष दाखवणे योग्य नाही पण नुसते गुणांबद्दल बोलणे आणि दोष झाकून ठेवणे ही फसवणूक आहे.)
२. ज्या गोष्टी शक्य नाहीत त्यालाही होकार देणे ("नाही" म्हणता न येणे हा भारतीयांची खासियत म्हणता येईल. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा अनुभव पावलोपावली येत असतो.)
 
हे ऐकीव/वाचीव (असा शब्द आहे का?) माहितीवर आधारित आहे. तपशील माझ्याकडे नाहीत. पण भारतीयांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिह्ने हळूहळू का होईना पण उठत आहेत.