मला वाटते लाज वाटणे हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. म्हणजे एखाद्याला तोकडे कपडे वापरण्याची लाज वाटेल तर एखाद्याला बुरख्यात वावरावयास लागते म्हणून आपल्या समाजाची लाज वाटेल.

अगदी पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला असे वाटते.

तुम्ही लोक कसे काय राहता?

कारण तो आमचा स्वतःचा देश आहे. We belong there. आम्ही जन्मापासून तेथेच राहतो त्यामुळे सवय आहे, होते. परिस्थितीला तोंड कसे द्यायचे याचे जुजबी ज्ञानही येते. आमच्या देशांत अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यात आम्ही अद्याप यशस्वी नाही. कालांतराने ते सुटतील अशी आशा आहे. तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल खेद वाटतो. (बाहेरच्यांसमोर आपल्या घरातले वासे मोजून दाखवू नयेत पण खोट्या बढाया मारू नयेत असे वाटते.) मला यात लाज वाटत नाही.

भारतीय संस्कृती जागतिक पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे का?

१००% नसावी परंतु अजीबात नाही असे म्हणणार नाही.

भारतात येताना काळजी घ्यावी का? (जसे अंगभर कपडे घालावेत?)

प्रश्नाचे उत्तर दोन भागांत देते. पहिला भाग - भारतात येताना काळजी घ्यावी का? अर्थात. आपण जेथे जातो तेथे आपल्याच सारखी संस्कृती नांदते अशा भ्रामक कल्पनेत बरेच पाश्चात्य जगतात असा मला अनुभव आहे. भारताच सोडा, एखादी स्त्री सौदी अरेबियाला जाते आहे तेथे ती काय कपडे घालून जाईल आणि त्या अरबांकडे अशीच तक्रार करेल असे वाटते? की भारतीय माणसे ही दबतात, आपल्यापेक्षा कनिष्ठ असतात, आपण यांच्यावर १५० वर्षे राज्य केले पण तरीही त्यांच्यात फारशी सुधारणा नाही या भावनेतून हे येत असावे?

असो. एखाद्या स्त्री समवेत असे होणे लाजीरवाणे आहे, मग ते जगाच्या पाठीवर कोठेही असो.

(जसे अंगभर कपडे घालावेत?) - भारतातील गावागावांत नाही परंतु प्रमुख शहरांतील मुली आणि त्यांच्या वेशभूषा पाहिल्या तर असा प्रश्न उद्भवू नये. गेल्या भारत खेपेत मला लोकांच्या नजरा मुलींना वळून वळून न्याहाळणे कमी झाले आहे असे वाटून गेले कारण ९०% मुली तोकड्या किंवा तंग कपड्यांतच होत्या. (तोकड्या किंवा तंग कपड्यांविषयी माझे काहीच म्हणणे नाही, ज्याने ज्याला जसे आवडते तसे कपडे वापरावेत.) परंतु गोऱ्या कातडीचे अवास्तव आकर्षण, पाश्चात्यांच्या मुक्त संस्कृतीबद्दल असलेल्या चुकीच्या कल्पना यामुळे या बायका आपल्याला सहज साध्य होतील अशी एक खुळी कल्पना पुरूषांच्या मनात येत असावी असे वाटते.

भारतीयांना पर्यटकांशी कसे वागावे याचे शिक्षण देणे आवश्यक आहे?

नक्की कोणाला आणि किती जणांना? शिक्षणाने अशा गोष्टी साधतात का? तसे असते तर अमेरिकेत राहून आपल्या बायकांना भर उन्हाळ्यांत वॉटर पार्कमध्ये संपूर्ण कपड्यांत नेऊन स्वतः पोरांबरोबर पाण्यात डुंबणारे आणि बायकोला टॉवेल सांभाळायला लावणारे नवरे दिसले नसते. चंद्रग्रहणाच्या दिवशी घरातून बाहेर पडायला नको म्हणणारे विद्वान भेटले नसते. (ते ही दस्तुरखुद्द अमेरिकेत जे चंद्रावर तळ ठोकून आले.) शिक्षणाने नोकरी, पैसा याखेरीज नेमके काय साधता येते याबाबत मी साशंक आहे. मला अशा माणसांचीही लाज वाटते.

'टीप' (की भीक?) संस्कृतीचे काय?
हा प्रकार माझ्या देशात चालतो याची मला अतिशय लाज वाटते. मुख्य म्हणजे लहान-थोर सर्वच कुठली ना कुठली टीप मिळवण्यास उत्सुक दिसतात.

माझ्या देशात दारिद्र्य व गलिच्छपणा आढळतो याचा मला त्रास होतो, वाईटही वाटते पण लाज वाटत नाही. माणुसकीचा जेथे जेथे अभाव दिसतो आणि ज्याचा शिक्षणाशी संबंध असलाच पाहिजे असे नाही त्या त्या गोष्टीची मला जरूर लाज वाटते.