कट्ट्यात उत्स्फूर्तता असावी म्हणून जाणीवपूर्वक फार काही नियोजन वगैरे केलेले नाही. तथापि दोन कार्यक्रम करावे अशा सूचना आल्या आहेत. एक म्हणजे रविवारी सकाळी मनोगतींचा 'माझा आवडता / ती मनोगती लेखक / लेखिका' या विषयावरचा मुक्त परिसंवाद. आणि दुसरे म्हणजे तात्या अभ्यंकरांचे 'यमन' या विषयावरचे प्रकटन. अगदी तयारी वगैरे नसली तरी तरी विचार करून ठेवायला वेळ मिळावा म्हणून आधीच कळवतो आहे.
कट्ट्यासाठी संगीतश्रवण योजना मी करतो आहे. अनिरुद्धने छायाचित्रणाची जबाबदारी स्वीकारली आहे. आपापल्या निवडीच्या कॅसेटस / तबकड्या आणू शकलात तर त्याचे स्वागत आहे. कट्ट्याच्या ठिकाणी दूरदर्शन संच नाही त्यामुळे चलचित्र तबकड्या पहाता येणार नाहीत.
कट्ट्यातील (सु)संवादाचे ध्वनिमुद्रण करावे अशी एक सूचना आहे. त्यासाठीची सामुग्री कुणाजवळ असल्यास कृपया तसे मला कळवावे.
कट्ट्याच्या आर्थिक नियोजनाबाबत येथे लिहिणे गरजेचे आहे. कट्ट्यासाठी होणारा खर्च सगळ्यांमध्ये विभागून घेऊ. यासाठी सहभागी होणाऱ्यांनी माणशी ३०० रुपये द्यावेत असे मत पडले आहेत. इतके कदाचित लागणार नाहीत, पण असू द्यावेत. कट्ट्याच्या शेवटी कुणीतरी रुक्ष हिशेब जमवून उरलेले पैसे काटेकोरपणे परत करेल!
याबाबत आठवण करून देणे संकोचाचे होईल. कृपया हे ध्यानात असू द्यावे.