परवा इथे (केंब्रिजात, मित्राच्या घरी) जी चर्चा झाली तो विषय मनोगतावर द्यावा. लोकांना काय वाटते पहावे या हेतूने हा धागा उघडला होता. गमतीची गोष्ट म्हणजे इथल्या आमच्या छोट्या गटात दोन तट पडले. आणि मनोगतावरील बहुसंख्यांच्या मताप्रमाणेच आमच्या गटातील बहुसंख्यांचे मत पडले. (संख्याशास्त्राचा विजय असो. ;-))

इथे बहुसंख्य लोकांचे मत

'आम्ही आहोत हे असे आहोत; पाहिजे तर या नाही तर चालू लागा!'
'देशाची लाज वाटते म्हणजे काय!? ठेचा त्याला!! देशाचा अभिमानच वाटायला हवा.'
'चुका कोणत्या प्रांतात, देशात नसतात? आमच्यावर का शरसंधान मग?'
'इंग्रज आणि फ्रेंच लोक काय मोठे संत होते की काय? मग भारतीयांनी गुंडगिरी केली तर कुठे बिघडले?'

असे काहीसे आहेत असे वाटते.

उरलेल्यांचे विचार ढोबळमानाने

'हो! बंगलोरसारख्या मोठ्या शहरात एका स्त्रीला अशा गोष्टींचा सामना करावा लागला हे वाचून वाईट वाटले.'
'पैसे मागण्याची वृत्ती वाढते आहे. त्याची लाज वाटते'
'जागतिक पर्यटकांसाठी भारत पूर्णपणे तयार नाही.' 
'परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी करायला हवे.'

अश्या प्रकारचे आहेत.

तर पहिल्या गटासाठी:

बाकीच्या जगात गुन्हेगारी आहे म्हणून आपल्या 'आनंदकंद' देशात ती असणे समर्थनीय आहे का? मला इतर ठिकाणचे माहित नाही, पण युरोपात व इंग्लंडात कोणी तुमच्याकडे टक लावून पहात नाही. अश्लील हावभाव करीत नाही की तुम्हाला उद्देशून अश्लील बोलत नाही. सार्वजनिक ठिकाणी प्रणयप्रदर्शन चालते. पण त्यात तुम्हाला 'उद्देशून' काही नसते. तुमचा अपमान करण्याचा हेतू नसतो. बिलापेक्षा जास्त पैसे कोणी मागत नाही. टीप असेल तर ती प्रमाणित व सगळ्यांना सारखी असते. इंग्रजांनी शंभर वर्षांपूर्वी बलात्कार केले म्हणून आम्ही आता करणार हा तर्क ब्राह्मणांनी दलितांवर अत्याचार केले म्हणून आता दलितांची पाळी आहे अश्या प्रकारचा आहे.

त्वचेच्या रंगावरून, चेहरेपट्टीवरून भेदभाव सगळीकडे होतात. (ते समर्थनीय मुळीच नाहीत.) पण पर्यटक म्हणून जाल तर तुमचे कौतुकच होते. उदा. स्वित्झर्लंडमध्ये तपकिरी काळ्या लोकांबद्दल राग आहे. कारण श्रीलंकेतील अराजकानंतर बरेच श्रीलंकन लोक स्वित्झर्लंडला गेले, तिथे स्थायिक झाले. त्यामुळे पर्यटकासारख्या न दिसणाऱ्या मला सुरुवातीला थोडा वाईट अनुभव आला. पण मोठा कॅमेरा गळ्यात अडकवून फिरायला लागल्यावर नुसते कौतुक! तेव्हा आलेला माणूस 'बाहेरचा' आहे, त्याला चांगले तेव्हढे दाखवावे ही पर्यटकमित्रता भारतीयांत कमी आहे का असा माझा प्रश्न होता.

दुसऱ्या गटासाठी:

भारताविषयी अभिमान असल्यास भारतीयांचे चुकीचे वागणे पाहून लाज वाटणे स्वाभाविक आहे. भारत सोडून गेल्यावर पुष्कळदा हा अभिमान जास्त धारदार होतो व मग जास्त लाजिरवाणे होते! भारतात राहणाऱ्या भारतीयांत असा प्रखर अभिमान रुजवल्यास त्यांचे पर्यटकांबाबतचे वर्तन सुधारेल का असा माझा प्रश्न होता.

आता माझे मत:

मला भारताचा (महाराष्ट्राचा, साताऱ्याचा इ इ) अभिमान वाटत नाही, त्यामुळे भारताची लाज वाटण्याचा प्रश्न नाही. बंगलोरसारख्या ठिकाणी अजुनही स्त्रियांना अपमानास्पद वागणूक मिळू शकते याचे वाईट वाटले. मित्राला वाटले, की पाहुणे लोक आपल्या घरी (= भारतात) गेले व त्यांचा अपमान झाला.. मला तसे वाटत नाही. भारताचे अब्जावधी नागरिक कसे वागतील कोणी सांगावे?