मजा आली हे परीक्षण वाचतांना. खूपच खुसखुशीत आणि छान लिहिले आहे. अभिनंदन, अनु! आपण एक चांगल्या चित्रपट समीक्षक होऊ शकता. धूम - २ मी देखील पाहिला आणि चक्क लक्ष्मीनारायण मध्ये पाहिला (सिंगल स्क्रीन टॉकीज वर चित्रपट पाहिला असे खुलेआम सांगत नसतात आजकाल. खूप निर्भत्सना करतात लोकं, अगदी आई-वडील देखील "करमजले, हमारे मूह को कालक पोंछ दी, नाक कटवा दी हमारी..." वगैरे बोलून हजेरी घेतात म्हणे. या पार्श्वभूमीवर आमचे, म्हणजे माझे आणि माझ्या बिपाशाचे, बायकोचे हो! धाडस कौतुकास्पद आहे, नाही?) हा चित्रपट इतका "हिट" झाला आहे की मल्टीप्लेक्स मध्ये आम्हाला तिकिटच मिळाले नाही. आमच्या इथे, म्हणजे कार्यालयात, तर मला मी लक्ष्मीनारायण मध्ये चित्रपट पाहिला हे सांगताच येत नाही. आमच्या इथली मंडळी आयनॉक्स, गोल्ड ऍड्लॅब्ज, फेम, ई-स्क्वेअर, सिटी प्राईड, मुंबईचे सिनेमॅक्स असल्या इंग्रजी नावांच्या बहुपडदा चित्रपटगृहातच चित्रपट पाहतात. कित्त्येकांना एकपडदा चित्रपटगृहे काय असतात हेच माहित नाही. त्यात लक्ष्मीनारायण म्हणजे जुने वाटणारे, देवाचे नाव! म्हणजे तिथे चित्रपट पाहणे आपल्या स्टेटसला न शोभणारे आहे असे या नवयुवक आणि नवयुवतींना आणि नवश्रीमंतांना (विशेषतः संगणक प्रणाली क्षेत्रातल्या नवधनवंतांना) वाटते. पण धूम - २ सारखा दीड-दमडीचा चित्रपट १५० रुपये मोजून पहायचा आणि पार्किंग साठी १० रुपये, पॉपकॉर्न साठी २० रुपये, बेचव कॉफीसाठी १५ रुपये देऊन धन्यता मानायची हे मला तितकेसे रुचत नाही. बाहेर दरोडा घालणारे शेकडो लोकं बसले आहेत, दरोडा पडू द्यायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे. असो. आता काळ बदलतो आहे असं म्हणतात (असं नेहमीच सगळ्या पिढीतले लोकं म्हणत असतात.) त्यामुळे काळानुसार बदलणं आवश्यक आहे. लक्ष्मीनारायणमध्ये आम्ही ५ रुपयाचा  वडापाव आणि अडीच रुपयाचा चहा इतक्या कमी भांडवलावर चंगळ केली शिवाय तिथला वडा झणझणीत आणि ठसका आणणारा होता त्यामुळे अस्मादिक अधिक खूश झाले. आमच्या गावी तर तट्ट्यांचे उघडे चित्रपटगृह होते. संध्याकाळी ७ वाजेनंतर चित्रपट सुरू व्हायचा. १० वाजता संपायचा आणि लगेच दुसरा खेळ सुरू व्हायचा, तो १ वाजेपर्यंत संपायचा. त्या खेळाला सेकंड शो म्हणत असत. तिथे १ रुपयात भाजलेल्या शेंगा मिळत असत. याखेरीज कुठलाच खाद्यपदार्थ किंवा पेय तिथे मिळत नसे. मिळाले असते तरी कुणी घेतले नसते. मध्यंतरामध्ये एक माणूस येऊन बाहेर जाणाऱ्यांना पास देत असे, तो पास परत देऊनच आत यायला मिळायचे. सध्यासारखा पाऊस कधीही येत नसे. पावसाळा संपला की पाऊस ही संपत असे. मग फिरून तो तोंड दाखवत नसे. त्यामुळे ८ महिने ते चित्रपटगृह व्यवस्थित चालत असे. ४ महिने मात्र पूर्ण बंद ठेवावे लागत असे. आम्हाला नेहमी प्रश्न पडायचा की हा मालक हे चित्रपटगृह नीट बांधून का घेत नाही. तेव्हा टूरींग टॉकीजचा परवाना वेगळा असतो आणि तो मालक दरवर्षी नव्या नावाने चित्रपटगृह चालवीत असे वगैरे भानगडी जास्त कळत नसत. टुरींग टॉकीज नेहमी फिरतीवर असायला हवी या शासनाच्या नियमामुळे मालकांना ती बांधून घेता येत नसत. अमिताभ बच्चनचे सगळे हिट चित्रपट मी तिथे वडीलांसोबत किंवा भावासोबत पाहिले. शक्ती, शान, देशप्रेमी, खुद्दार, लावारीस, मुकद्दर का सिकंदर वगैरे चित्रपटांच्या आठवणी अजून ताज्या आहेत. पिक्चर बघायला जायचे असा कट २-३ दिवसांपासून शिजायचा. मग एक दिवशी आम्ही, म्हणजे माझा भाऊ आणि मी भित-भित वडीलांकडे प्रस्ताव मांडायचो. वडील "कुठला चित्रपट बघणार आहात?" वगैरे विचारायचे नाहीत. अगदी लहान गाव असल्याने सगळ्यांना माहित असायचे की कुठला चित्रपट सुरू आहे ते. शिवाय रोज सकाळी आणि संध्याकाळी गावातून सिनेमाची पाटी वाजत-गाजत जात असे. बालमनावर परिणाम वगैरे प्रमेये तेव्हा तेव्हढी तेजीत नव्हती. कदाचित चित्रपटांमध्ये तसलं काही फारसं नसायचं तेंव्हा. मग वडील परवानगी देत आणि आम्ही शाळेत जातांना देखील त्या चित्रपटाबद्दल बोलत जात असू. दिवसभर शाळेत अजिबात लक्ष लागायचे नाही. सारखा अमिताभ, विनोद खन्ना वगैरे डोळ्यासमोर नाचत असत. गणितांमधून अचानक अमिताभचे कालियाचे पोस्टर बाहेर येत असे. कशी-बशी शाळा संपवून आम्ही घरी येत असू. पटापट जेवण करून ऐटीत सिनेमा बघायला जायचो. येतांना आम्ही एक शब्दही एकमेकांशी बोलत नसू. सिनेमाचा प्रभाव जायला वेळ लागायचा. झोपतांना अमिताभची मारामारी किंवा जितेंद्रचा नाच, किंवा श्रीदेवीचा ताथय्या, ताथय्या हो ओ ओ...किंवा झीनत अमानचा प्यार मे दिल पे मार दे गोली नंतर चा बंदुकीचा आवाज असलं काही-बाही आठवत आम्ही झोपी जायचो. आज देवाच्या कृपेने वाट्टेल तेंव्हा, वाट्टेल तो, वाट्टेल त्या अलिशान, वातानुकुलीत, पंचतारांकित चित्रपटगृहांमध्ये सिनेमा बघण्याची ऐपत आहे पण..... ती मजा नाही येत हो! सगळं आहे, सगळं खूप चांगलं आहे, सगळं खूप सोपं आहे, तरी काहीतरी उणीव आहे, काहीतरी खूप मागे सोडून आल्यासारखं वाटत आहे. मी भूतकाळात वगैरे रमणारा आहे असं कदाचित वाटेल यावरून, पण भूतकाळात सगळेच रमतात. मी आजही तितक्याच उत्साहाने चित्रपट बघतो, कार्यालयातल्या इंट्रानेटवर समीक्षा लिहितो. कदाचित एकंदरीत आयुष्याची झटपट बदलणारी समीकरणे, प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाच्या बदलणाऱ्या प्राथमिकता,  आणि बाह्यजगाचा क्षणोक्षणी बदलणारा मुखवटा, कधी आकर्षक तर कधी भेसूर, यामुळे आयुष्य उपभोगण्याच्या, अनुभवण्याच्या संकल्पना ही बदलत आहेत, त्यामुळे हा फरक जाणवत असेल!

--समीर