'माणूस नावाचा बेटा' आत्मचरित्रात्मक वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे ; परंतु दत्तूच्या सर्वच विचारांना जी एंचे पालकत्त्व बहाल करणे चुकीचे होईल. दुसरे म्हणजे, जी एंच्या इतरही कथांमधून त्यांच्या पात्रांच्या तोंडातून जीएच बोलत आहेत हा प्रत्यय येतो.  शेवटी सुनीताबाई देशपांडे यांनी म्हण्टल्याप्रमाणे , एका जी एंमध्ये अनेक माणसे एकदमच वस्तीला होती. त्या सर्वांचेच हुंकार त्यांच्या लिखाणातून ऐकू येतात. एकूणच जी एंचा लिखाणकामाठीकडे पहाण्याचा दृष्टिकोन एखाद्या शास्त्रज्ञासारखा प्रयोगशील होता असे म्हणावेसे वाटते. किंवा एखाद्या शिल्पकारासारखा . काही प्रसंग , घटना, व्यक्ती यांना एखाद्या प्रमेयासारखे एकमेकांत गोवून , त्यांचा आकार काय बनतो, समग्र अस्तित्त्वाच्या तिढ्यावर काही प्रकाश पडतो का याचा हा एक न संपणारा शोध वाटतो खरा. आणि या शोधाच्या तंत्रावर , त्याकरिताच्या भाषिक उपकरणांवर कमालीचे प्रभुत्व. प्रत्येक कथेमधील भूकंपाला जरी अनेकपदरी आणि गुंतागुंतीचे संदर्भ असले तरी प्रत्येक कथा म्हणजे एकसमयावच्छेदेकरून घडलेली एक उलथापालथ असे सामान्यपणें म्हणता येईल. आणि ही सगळी बंदीश घडते प्रतिमा आणि प्रतिकांच्या कोरीव कामातून. म्हणूनच माधव आचवलांनी त्यांच्या कामगिरीचे वर्णन करताना म्हण्टले आहे : "त्यांची प्रतिज्ञा आहे उत्तुंग शिल्पे बनवावयाची. परंतु त्यांनी आयुधे निवडली ती नाजूक कोरीवकाम करणाऱ्या कलावंतांची." जी एंच्या कामाची व्याप्ति आणि तिचे मर्म मला वाटते आचवलांना इकडे सापडले आहे.