एकूणच जी एंचा लिखाणकामाठीकडे पहाण्याचा दृष्टिकोन एखाद्या शास्त्रज्ञासारखा प्रयोगशील होता असे म्हणावेसे वाटते. किंवा एखाद्या शिल्पकारासारखा . काही प्रसंग , घटना, व्यक्ती यांना एखाद्या प्रमेयासारखे एकमेकांत गोवून , त्यांचा आकार काय बनतो, समग्र अस्तित्त्वाच्या तिढ्यावर काही प्रकाश पडतो का याचा हा एक न संपणारा शोध वाटतो खरा. आणि या शोधाच्या तंत्रावर , त्याकरिताच्या भाषिक उपकरणांवर कमालीचे प्रभुत्व. प्रत्येक कथेमधील भूकंपाला जरी अनेकपदरी आणि गुंतागुंतीचे संदर्भ असले तरी प्रत्येक कथा म्हणजे एकसमयावच्छेदेकरून घडलेली एक उलथापालथ असे सामान्यपणें म्हणता येईल. आणि ही सगळी बंदीश घडते प्रतिमा आणि प्रतिकांच्या कोरीव कामातून.
जी.एंच्या लिखाणाचं अत्यंत चोख विश्लेषण आपण येथे केले आहे, मुक्तसुनित. धन्यवाद.
'माणूस'बद्दल लिहितांना संजोपांनी हे अधोरेखित केले आहे की, ह्या कथेतला protagonist जो दतू आहे, तो जी.एंच्या स्व:तच्या (तत्कालिन) आयुष्यावर आधरित आहे. ही त्यांची सुरुवातीची कथा असल्याने असे होणे थोडेसे स्वाभाविकच आहे. पण त्या सुरुवातीच्या काळातसुद्धा त्यांचे अनुभव कसे तर, घसघशीत, बावन्नखणी चांदीच्या रुपयाप्रमाणे खणखणीत. त्यांत कोठेहि हिणकसपणा नाही. मानवाला असहाय्यपणे भोगाव्या लागणाऱ्या यातना, त्यांना सामोरे जाण्याच्या त्याच्या विविध तऱ्हा, कुठल्याही एका विवक्षित परिस्थितीत त्यांच्या वागण्याच्या भिन्न भिन्न तऱ्हा, ह्या सर्वांचं एक अजब मिश्रण ते आपल्यासमोर मांडतात, त्याला त्यांच्या खोल चिंतनाची जोड देवूनच. जी. एंच्या कथांत वरवरच्या जखमांचे कौतूक नाही. 'लाल, उष्ण मांस दिसले पाहिजे' !
संजोपांच्या 'जी.एंचा मी चाहता आहे, म्हणून त्यांच्या 'आत्मचरिप्तपर' ह्या कथेबद्दल आपुलकी वाटते', ह्याबद्दल मात्र मी थोडा मतभेद दर्शवू इच्छितो. जेव्हा पहिल्यांदाच एखादी कथा आपण वाचतो, तेव्हांच तिच्याबद्दल मनांत एक बरावाइट ठसा उमटतो. आपण काही वाचावयाच्या अगोदर असे थोडेच ठरवतो, की 'ही माझ्या आवडत्या लेखकाची कथा आहे, म्हणून ती मला आवडावी' ? मग जरी त्यांतला नायक आपल्या कथाकाराच्यासदृश्य असला तरी?
जाता जाता, कोण्या एका चौधरी नामक लेखिकेने जी. एंच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर बेतलेली 'कादंबरी' लिहिण्याचा उपद्व्याप केला होता. त्यानुसार त्यांच्या जीवनांत दारूण प्रेमभंगाचा प्रसंग दाखवला आहे. लेखिकेच्या म्हणण्यानुसार ही कादंबरी सत्य घतनांवर आधारित आहे. स्त्रीच्या विविध भूमिकांबद्दल जी.ए. अगदी परस्पर विरोधी perspective घेतात, त्याबद्दल वर थोडी चर्चा वर झाली आहे, त्यानिमित्ताने हे येथे संगितले.
.....प्रदीप