किंग खान असे संतापजनक नाव धारण करणाऱ्या शाहरुखला निर्मात्यांची पसंती का? तर "अरे साला, उतनेही पैसे में सिर्फ ऍक्टिंग नही, ओव्हरऍक्टिंगभी करता है" असे ऐकले होते!
मधुबालासाठी भारत भूषण, आशा पारेखसाठी विश्वजीत, साधनासाठी राजेंद्रकुमार अशी सहनशक्तीची लाजिरवाणी परंपरा आपल्या वाडवडिलांपासून चालत आली आहे. ते काही नाही, ह्या अनिष्ट प्रथा थांबायलाच हव्यात.
साधनासाठी 'ऐ फूलों की रानी' गाताना  दोन्ही हाताच्या तराजूच्या पलड्यांप्रमाणे वरखाली हालचाली करणारा राजेंद्रकुमार (आरजू) तर आपण सहन केलाच, पण त्याआधीही समोर तिचे साक्षात ' लग जा गले'असे आवगाहन असताना आमांश झाल्याप्रमाणे चेहरा करणारा मनोजकुमारही (वो कौन थी?)  पचवला. याच मनोजकुमारला जिचं पडद्यावर आगमन झालं की भावनावेग अनावर होऊन शिरीष कणेकरांच्या मित्राला तोंडात भाजीची पिशवी कोंबावी लागावी अशा माला सिन्हासाठी आपण पचवला(हरियाली और रास्ता), 'तोबा ये मतवाली चाल' हे शब्दशः सिद्ध करणाऱ्या फटाकड्या मुमताजसाठी पचवला (पत्थर के सनम), 'कोई जब तुम्हारा हृदय तोड दे. तडपता हुवा जब कोई छोड दे, तब तुम मेरे पास आना प्रिये...' अशी कुणीही विनवणी करावी अशा फाकडू सायरा बानूसाठी पचवला(पूरब और पश्चिम). याच छैलछबिल्या सायरासाठी आपण मतिमंदी अभिनय करणारा सुनील दत्त (पडोसन) पचवला. त्यामुळं गायत्री जोशीसाठी शाहरुख म्हणजे खरं तर सौदा सस्त्यात पडला असंच म्हणायला पाहिजे. पण एकंदर आपल्या पचनशक्तीचा जयजयकार असो!