वा रावसाहेब, एकंदर मृत्यूच्या दिवशीचा बेत झकास आहे. आइसक्रीम झाल्यावर तेवढं पान खायचं राहून गेलं बघा. नंतर मग उगाच चुटपूट लागून राहायची!
आपण स्वतः वेळापत्रक घालून दिल्याप्रमाणे मृत्यू आला तर कोणाला नको आहे? पण साधारणपणे हे केवळ देहान्ताची शिक्षा झालेल्यांना किंवा जिवंतपणे समाधी घेणार्यांनाच शक्य आहे. शिवाय बहुतेक लोकांच्या वेळापत्रकाची व्याप्ती जरा जास्त असते, आणि त्यात एकदातरी ताजमहाल पाहणे (चांदण्या रात्री, प्रिय व्यक्तीच्या हातात हात घालून, अमर प्रेमाची याद इ.), ग्रँड कॅन्यन, पॅरिस, झालंच तर नातवंडांना खेळवणे अशा गोष्टींचाही समावेश असतो. एवढं करून शेवटी - अरेच्च्या कन्याकुमारीला जाऊन सूर्यास्त बघायचा तेवढा राह्यलाच, हे असतंच.
मृत्यू केव्हा, कुठे, आणि कसा येईल हे सांगता येत नसल्यामुळे खरा घोटाळा होतो. सगळ्यात जास्त भय तो कसा येईल ह्या गोष्टीचं असतं असं वाटतं. तीळ तीळ झिजत 'आता तूच सोडव ह्यातून' असं म्हणणार्यांना, किंवा 'सगळं झालं आहे, केव्हाही ये, मी तयार आहे' असं म्हणणार्यांनाही तो वर्षानुवर्षं तिष्ठत ठेवू शकतो.
शेवटी आपण वर वर्णन केल्याप्रमाणे प्रत्येक दिवसाचा अनासक्त आस्वाद घेता आला, तर मग मृत्यू आग्र्याला जायचं तिकिट काढल्यावर आला काय, किंवा दुपारी जेवताना पुरणपोळीचा पहिला घास कटाच्या आमटीत बुडवताना आला काय, जाणं तेवढं सुकर होईल.