जवानांच्या कुटुंबीयांकडून शौर्यपदके सरकारला परत
नवी दिल्ली, ता. १३ - महंमद अफजल गुरू याला झालेली फाशीची शिक्षा अमलात आणण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ संसदेवरील हल्ल्याच्या वेळी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सुरक्षा दलाच्या आठ जवानांच्या कुटुंबीयांनी त्यांना मिळालेली शौर्यपदके आज परत केली. या विलंबाचे संसदेत तीव्र पडसाद उमटले. .......
माफीच्या अर्जावर निर्णय होण्यास सहा-सात वर्षेही लागू शकतात, असे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी राज्यसभेत सांगितले.
पाच पाकिस्तानी अतिरेक्यांनी १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यास आज पाच वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यामागील सूत्रधार महंमद अफजल गुरू याने त्याच्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा, अशी विनंती करणारा अर्ज आज नव्याने केला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज सकाळी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी शहीद जवानांना चकमक झालेल्या ठिकाणी जाऊन श्रद्धांजली वाहिली. शहीद जवानांच्या पत्नी, मुले व इतर कुटुंबीय या वेळी उपस्थित होते. संसद भवनातून हे कुटुंबीय राष्ट्रपती भवनात गेले आणि त्यांनी शौर्यपदके परत केली. त्यांच्याबरोबर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संसद भवनातील दोन कर्मचारी व एका छायाचित्रकाराचे कुटुंबीयही होते. सरकारने जवानांना अतुलनीय शौर्याबद्दल मरणोत्तर ही पदके जाहीर केली होती.
अफजलला फाशी होईपर्यंत आम्ही परत केलेली शौर्यपदके राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात यावीत, अशी अपेक्षा जवानांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना भारतीय जनता पक्ष प्रक्षोभित करीत आहे, या गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या विधानाबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. अफजलला माफी दिल्यास ती जवानांनी केलेल्या बलिदानाची थट्टा ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
""अफजलच्या फाशीची शिक्षा आम्ही दिलेली नाही, तर न्यायालयाने दिली आहे. संकुचित राजकारणामुळे ही शिक्षा प्रत्यक्षात येण्यास विलंब लागत असल्याने आम्हाला शौर्यपदके परत करणे भाग पडत आहे....''
- शहीद फौजदार नानक चंद यांच्या पत्नी गंगादेवी.