एका संगीतमहोत्सवाबद्दल त्यामध्ये सादर झालेल्या सुमधुर संगीताशिवाय इतर कांहीतरी लिहिण्याचे धाडस करतांना मला थोडी धाकधूकच वाटत होती. पण आमच्या अण्णांनी इतकं जबरदस्त गुडविल निर्माण करून ठेवले आहे की नुसत्या त्यांच्या उल्लेखानेच मनातील ऋद्य आठवणी व भावना उचंबळून येतात याचे प्रत्यंतर प्रतिसाद वाचतांना आले. समारंभ सुरू असतांनाही ते तेथे येऊन व प्रकृति अस्वास्थ्यामुळे गाडीत बसून कां होईना, पण प्रेक्षकांना भेटून आपले मनोगत व्यक्त करून जायचे. या प्रत्येक वेळी टाळ्याच्या प्रचंड गडगडाटाने त्यांना दाद मिळायची.