वाह! विकी तुम्ही नेहमी खूप छान विषयांना हात घालत असता. त्याबद्दल तुमचे अभिनंदन !

संत गाडगेबाबा हे माझं दैवत . गो. नी. दांडेकरांनी त्यांचं चरित्र खूप सुंदर लिहिलेलं आहे. विशेष म्हणजे गो. नी. दांनी त्यांच्या सोबत प्रवास केलेला आहे.

मागे  मटा मध्ये गाडगेबाबांवर दोन लेख आले होते ते येथे देत आहे.  

===============================

संत गाडगेबाबा 1 : परिवर्तनाचा चमत्कार


गेल्या तीस-चाळीस वर्षांमध्ये बुद्धिवादी आणि प्रागतिक विचारसरणीचा तेजस्वी वारसा असलेल्या आपल्या महाराष्ट्रात काही गोष्टींचे पीक अधिक जोमाने फोफावते आहे. परिटघडीचे कपडे घालून सत्ता आणि पदे यांच्यासाठी जीव पाखडणारी आणि आपल्या 'गॉडफादर'च्या आगे-मागे अहोरात्र धावणारी राजकारणातील तरुण मंडळी यांचे एक पीक वारंवार पडणाऱ्या दुष्काळातही चांगले फोफावते आहे.

त्यातच अठरापगड जाती-जमातींना चारने गुणल्यावर निर्माण होणाऱ्या जातीनिहाय संघटनांचे स्वयंघोषित नेते नि संस्थापक यांची त्यात सातत्याने भर पडते आहे. कसायाच्या दावणीला बांधलेल्या मेंढरांच्या गळ्यातल्या दोरीप्रमाणे आपल्या इवल्याश्या जाती - जमातीच्या गळ्यातली दोरी एका हातात आणि त्यांच्या उद्धाराची घोषणा करीत उभारलेला मूठबंद दुसरा हात आकाशाकडे नेत नेतृत्व करणारा हा स्वयंघोषित नेता मनामध्ये दुसरी काहीतरी प्राप्ती व्हावी, अशी स्वप्ने पाहणारा असतो.

या राजकारणी पिकाइतकेच दुसरे फोफावत चाललेले पीक म्हणजे तथाकथित संत-महंताचे; साधू महाराजांचे, देवी-देवतांचे आणि माता-अम्मांचे! स्वत:ला ईश्वरी साक्षात्कार झाला असे सांगणारे; आपण स्वत: ईश्वराशी संभाषण केले असा दावा करणारे; आपल्या ईश्वरी शक्तीच्या आधारे नानाविध चमत्कार करणारे व अडाणी जनतेला दिपवून टाकणारे; केवळ स्पर्शाने, केवळ नजरेने भक्ताचे साकळलेले दु:ख दूर करून त्याच्या मनामध्ये 'आत आत' उतरून त्याचा उद्धार करणारे आणि वातानुकूलित मठीत चार-चार तास ध्यानधारणा करणारे अन् शून्यात नजर लावून मौनाची भाषा बोलणारे आणि या साऱ्यांच्या आधारे कसलेही कष्ट न करता, स्वत:चे चार पैसे खर्च न करता, अतिशय विलासी, संपन्न व भोगासक्त जीवन जगणाऱ्या साधू आणि महाराजांचे पीक तर अतिशय झपाट्याने फोफावते आहे आणि तितक्याच झपाट्याने त्यांच्या भक्तांचे पीकही वाढत चाललेले आहे.